चीन व रशियाची उद्दिष्टे समान आहेत

पुतिन यांच्याबरोबरील चर्चेत चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची ग्वाही

मॉस्को – चीन व रशिया या दोन्ही देशांची काही उद्दिष्टे समान आहेत व ती पूर्ण करण्यासाठी आपण परस्परांशी सहकार्य करून एकजुटीने काम करू शकतो, अशी ग्वाही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिली. जिनपिंग सोमवारी तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर दाखल झाले असून त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान पुतिन यांनी, युक्रेन संघर्ष थांबविण्यासाठी चीनने दिलेल्या प्रस्तावाचा आपण आदर करतो, असे वक्तव्य केल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली.

Russia's Putin holds talks with China's Xi in Moscowरशिया-युक्रेन युद्धाला वर्ष पूर्ण होत असताना पाश्चिमात्य देश रशियाला अधिकाधिक एकटे पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांचे निमंत्रण स्वीकारल्याने पाश्चिमात्यांमध्ये जबरदस्त अस्वस्थता आहे. त्यामुळेच जिनपिंग यांच्या दौऱ्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले गेले आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियाला आंतरराष्ट्रीय व्यवस्थेपासून तोडण्यासाठी जोरदार धडपड चालवली आहे. त्यासाठी रशियावर निर्बंधांचा जबरदस्त मारा करण्यात आला असून रशियाला सहाय्य करणाऱ्या देशांवरही दडपण आणले जात आहे. मात्र पाश्चिमात्यांच्या या दबावाकडे दुर्लक्ष करून भारत व चीनसह काही आफ्रिकी तसेच आखाती देश रशियाला सहकार्य करीत आहेत. चीन यात सर्वाधिक आघाडीवर असून युक्रेन युद्धाच्या काळात चीनने रशियाबरोबरील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढविल्याचे उघड झाले आहे. चिनी कंपन्या रशियाला शस्त्रे व संरक्षणसामुग्री पुरवित असल्याचे दावेही करण्यात आले आहेत.

रशियाला सहाय्य करीत असतानाच चीनने रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला आहे. युक्रेनने हा प्रस्ताव नाकारला असून अमेरिका व युरोपिय देशांनी सावधगिरीची भूमिका घेतली आहे. मात्र त्याचवेळी चीनने रशियाला घातक शस्त्रांचा पुरवठा केल्यास चीनला निर्बंधांचे लक्ष्य करण्याची धमकीही पाश्चिमात्य देशांनी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून रशिया दौऱ्यावर दाखल होणे महत्त्वाचे ठरते. रशियात उतरल्यानंतर जिनपिंग यांनी दहा वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेल्या रशिया दौऱ्याचा उल्लेख केला. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा उल्लेख करून चीन व रशिया हे आघाडीचे देश जागतिक व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्रितरित्या काम करतील, असा दावाही जिनपिंग यांनी केला.

leave a reply