चीनने फिलिपाईन्सच्या जहाजावर लेझर रोखले

अमेरिकेकडून फिलिपाईन्सच्या सुरक्षेची ग्वाही

philippines china laser-1मनिला/वॉशिंग्टन – वेस्ट फिलिपाईन्स सीच्या क्षेत्रात गस्त घालणाऱ्या आमच्या जहाजांवर चीनने ‘लेझर लाईट’ रोखल्याचा आरोप फिलिपाईन्सने केला आहे. लष्करी श्रेणीच्या लेझरचा वापर करून चीनने आमच्या जवानांना काही काळासाठी ‘ब्लाईंड’ केले होते, ठपका फिलिपाईन्स केला आहे. फिलिपाईन्सने केलेल्या या आरोपानंतर फिलिपाईन्सच्या सुरक्षेसाठी अमेरिका धावून जाईल, अशी ग्वाही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

गेली कित्येक वर्षे साऊथ चायना सीच्या वादावरुन चीन आणि फिलिपाईन्समध्ये तणाव निर्माण झाला आहे. फिलिपाईन्सचे सागरी क्षेत्र असलेले ‘वेस्ट फिलिपाईन्स सी’चे क्षेत्र देखील आपल्या मालकीचा असल्याचा दावा चीन करीत आहे. या सागरी क्षेत्रातील कलयान (स्प्रार्टले) आणि बाजो दी मासिंलोक (स्कारबोरो) या द्विपसमुहांवर फिलिपाईन्सचा प्रशासकीय अधिकार आहे. पण २०१२ साली चीनने येथील काही बेटांवर आपला हक्क असल्याचे सांगून त्यांचे लष्करीकरण तसेच काही बेटांची कृत्रिमनिर्मिती सुरू केली होती.

फिलिपाईन्सने सदर प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेल्यानंतर चीनच्या विरोधात निकाल गेला. तसेच चीनने या बेटांच्या क्षेत्रातून माघार घ्यावी, असे बजावण्यात आले होते. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करून चीनने फिलिपाईन्स दावा करीत असलेल्या बेटांवरील अतिक्रमण सुरू ठेवले आहे. या सागरी क्षेत्रात गस्त घालणाऱ्या फिलिपाईन्सच्या नौदल व तटरक्षदलांच्या जहाजांनाही चीनच्या नौदलाकडून धमक्या दिल्या जात आहेत.

philippines china laser६ फेब्रुवारी रोजी फिलिपाईन्सचा ताबा असलेल्या थॉमस शोल भागातही असाच प्रकार घडला. चीनच्या तटरक्षकदलाच्या जहाजाने फिलिपाईन्स तटरक्षकदलाच्या जहाजावर लेझर रोखले होते. यामुळे काही काळासाठी आपल्या जवानांची दृष्टी गेली होती, असे फिलिपाईन्सच्या तटरक्षकदलाने स्पष्ट केले. फिलिपाईन्सच्या सरकारने या कारवाईचा फोटोग्राफ प्रसिद्ध करून चीनच्या अरेरावीचा पुरावा दिला आहे. चीनची ही कारवाई फिलिपाईन्सच्या सार्वभौम अधिकारांचे उघडउघड उल्लंघन करणारी असल्याचा आरोप फिलिपाईन्सने केला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी चीनची ही कारवाई क्षेत्रीय सुरक्षा व स्थैर्यासाठी अतिशय धोकादायक असल्याचे म्हटले आहे. साऊथ चायना सीच्या सागरी क्षेत्राचे स्वातंत्र्य अबाधित राखणे आंतरराष्ट्रीय नियमानुसार आवश्यक आहे. पण चीन हे नियम पायदळी तुडवत असून चीनकडून फिलिपाईन्सच्या सुरक्षेला धोका निर्माण झालच तर अमेरिका १९५१च्या करारानुसार आपल्या सहकारी देशाच्या सुरक्षेसाठी धाव घेईल, असे प्राईस म्हणाले.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी जपानचा दौरा केला होता. येत्या काळात तैवानच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाच तर अमेरिकेला आपले लष्करी तळ देण्याचे संकेत फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले होते. यामुळे संतापलेल्या चीनने फिलिपाईन्सविरोधात ही कारवाई केल्याचा दावा केला जातो.

leave a reply