लडाखच्या एलएसीवरील तणाव नियंत्रित केल्याचा चीनचा दावा

बीजिंग – एलएसीवर निर्माण झालेला तणाव चीनने प्रभावीरित्या नियंत्रित केल्याचे प्रशस्तीपत्रक चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी आपल्याच देशाला दिले. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने हा वाद व्यवस्थितरित्या हाताळलाचा दावा वँग ई यांनी केला. प्रत्यक्षात लडाखच्या एलएसीवरील तणाव अजूनही निवळलेला नाही. उलट या ठिकाणी चीनने अतिरिक्त तैनाती केली असून भारतानेही याला प्रत्युत्तर देणारी तैनाती केली आहे. अशा परिस्थिीत एलएसीबाबत चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले दावे म्हणजे भारताबरोबरील या वादात चीनची सरशी झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठीच असल्याचे दिसत आहे.

लडाखच्या एलएसीवरील तणाव नियंत्रित केल्याचा चीनचा दावालडाखच्या एलएसीवरील काही ठिकाणी चीनने आपले लष्कर मागे घेतले आहे. त्यानंतर भारतानेही इथले सैन्य मागे घेऊन तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही देशांमधील चर्चेनुसार ठरल्याप्रमाणे चीन लडाखच्या एलएसीवरील इतर भागातून आपले जवान मागे घ्यायला तयार नाही. उलट इथला तणाव अधिकच वाढविण्यासाठी चीन लष्करी हालचाली करीत आहे. यामुळे उभय देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चेच्या १२ फेर्‍या झाल्यानंतरही लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी झालेला नाही. अजूनही एलएसीवर दोन्ही देशांचे ५० ते ६० हजार सैनिक तैनात असल्याचे सांगितले जाते.

लडाखच्या एलएसीवरील तणाव निवळलेला नाही. त्यामुळे आवश्यकता भासल्यास भारतीय वायुसेना अल्पावधित या क्षेत्रात तैनाती करू शकेल. तसेच वायुसेना या क्षेत्रात कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असे भारताच्या वायुसेनाप्रमुखांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी थेट चीनचा नामोल्लेख टाळून या देशाच्या भारतविरोधी कारवायांना सातत्याने लक्ष केले आहे. भारत एकाच वेळी पाकिस्तान व चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली होती.

यामुळे भारत व चीनच्या एलएसीवरचा तणाव कमी झालेला नसून उलट यात भर पडल्याचेच स्पष्ट संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत एलएसीवरचा तणाव यशस्वीरित्या नियंत्रित केल्याचा चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेला दावा म्हणजे धूळफेक ठरते. एलएसीवर चीन वर्चस्व गाजवित असल्याचे संकेत देण्याचा प्रयत्न याद्वारे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेला आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती अगदी वेगळी असल्याचे भारतीय लष्कर तसेच वायुसेनेने वेळोवेळी लक्षात आणून दिले. हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जनरल बिपीन रावत यांनी चीनच्या प्रचारयुद्धापासून भारताने सावध रहावे, असा इशारा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिला होता. एलएसीवरील वादात आपली सरशी झाल्याचा आभास चीन निर्माण करीत आहे, याकडे लक्ष वेधून जनरल रावत यांनी या धोक्याची जाणीव करून दिली होती. चीनचे परराष्ट्रमंत्री त्याच धर्तीवर काम करीत असून एलएसीवरील वाद चीनच्या नेतृत्त्वाने नियंत्रित केल्याचे दावे ठोकत असल्याचे दिसते.

leave a reply