‘साऊथ चायना सी’मधून अमेरिकेच्या युद्धनौकेला पिटाळून लावल्याचा चीनचा दावा

- अमेरिकेने दावा फेटाळला

बीजिंग/वॉशिंग्टन – साऊथ चायना सीमधील पॅरासेल आयलंडजवळून गस्त घालणार्‍या अमेरिकी युद्धनौकेला पिटाळून लावल्याचा दावा चीनने केला आहे. अमेरिकेची युद्धनौका ‘युएसएस बेनफोल्ड’ चीनच्या परवानगीशिवाय पॅरासेल आयलंड क्षेत्रात आली होती, असे चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने आपल्या निवेदनात म्हंटले आहे. मात्र अमेरिकेच्या सातव्या आरमाराने चीनचे दावे फेटाळले असून, ही गस्त अमेरिकी नौदलाच्या ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन’ मोहिमेचा भाग होती, असा खुलासा केला आहे.

‘साऊथ चायना सी’मधून अमेरिकेच्या युद्धनौकेला पिटाळून लावल्याचा चीनचा दावा - अमेरिकेने दावा फेटाळलासोमवारी अमेरिकेच्या सातव्या आरमाराच्या ‘युएसए बेनफोल्ड’ या युद्धनौकेने साऊथ चायना सीमधील ‘पॅरासेल आयलंड’ जवळच्या क्षेत्रात गस्त घातली. सागरी वाहतुकीचे हक्क व स्वातंत्र्याला अनुसरून ही गस्त घालण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. ही मोहीम आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार होती व चीनकडून करण्यात आलेले सावभौमत्त्वाच्या उल्लंघनाचे दावे चुकीचे असल्याचेही बजावले आहे. मात्र चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने, अमेरिकी युद्धनौकेला पॅरासेल आयलंड भागातून पिटाळल्याचा दावा केला. त्याचवेळी अमेरिकेने चिथावणीखोर कारवाया थांबवाव्यात, असा इशाराही दिला.

युद्धनौकेच्या गस्तीबाबत ठाम भूमिका घेणार्‍या अमेरिकेने साऊथ चायना सीच्या मुद्यावर चीनविरोधात अधिक आक्रमक धोरणाचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी फिलिपाईन्सच्या मुद्यावरून चीनला खरमरीत इशारा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय लवादाने चीनचे ‘साऊथ चायना सी’वरील दावे फेटाळून फिलिपाईन्सच्या बाजूने निर्णय दिला होता. त्याची आठवण अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली आहे. ‘फिलिपाईन्सचा विजय हा साऊथ चायना शी क्षेत्राशी निगडीत महत्त्वाची घटना आहे. या क्षेत्रातील हक्क व सागरी स्वातंत्र्य यांच्या संरक्षणासाठी अमेरिका कायम आपल्या भागीदार व सहकारी देशांबरोबर उभा राहिल’, असा इशारा ब्लिंकन यांनी दिला.‘साऊथ चायना सी’मधून अमेरिकेच्या युद्धनौकेला पिटाळून लावल्याचा चीनचा दावा - अमेरिकेने दावा फेटाळला

यावेळी अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका व फिलिपाईन्समध्ये 1951 साली झालेल्या संरक्षण कराराचाही उल्लेख केला. साऊथ चायना सीमध्ये फिलिपाईन्सच्या लष्करावर, नागरी जहाजांवर किंवा विमानांवर चीनने हल्ला केला तर अमेरिका संरक्षण करारातील तरतुदीनुसार फिलिपाईन्सच्या संरक्षणाची जबाबदारी घेईल, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी बजावले. ब्लिंकन यांनी अमेरिकी प्रशासनाने गेल्या वर्षी ‘साऊथ चायना सी’बाबत जाहीर केलेल्या धोरणाचाही पुनरुच्चार केला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020मध्ये जाहीर केलेल्या धोरणात, अमेरिका ‘साऊथ चायना सी’मधील चीनचे कोणत्याही प्रकारचे दावे मान्य करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्याचवेळी खुल्या व मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचेही स्पष्ट केले होते. ब्लिंकन यांनी, अमेरिकेचे बायडेन प्रशासनही या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हंटले आहे.

leave a reply