अस्वस्थ झालेल्या चीनची ‘जी7’वर टीका

लंडन – कोरोनाची साथ पसरवून चीनने 35 लाखाहून अधिकजणांचा बळी घेतल्याच्या आरोपांना बळ मिळत असताना, ‘जी7’ परिषदेत याचे पडसाद उमटले. कोरोनाच्या साथीबाबत चीनची भूमिका संशयास्पद ठरते, असे संकेत देऊन जी7च्या सदस्यदेशांनी याबाबत चीनने पारदर्शकता दाखवावी, अशी मागणी केली. त्याचवेळी पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवून गरीब देशांना आपल्या कर्जाच्या फासात अडकवणार्‍या चीनविरोधात जी7ने ‘बी3डब्ल्यू’ प्रकल्प हाती घेतला आहे. यावर अस्वस्थ झालेल्या चीनने जी7वर सडकून टीका केली.

एखाद्या छोट्या गटाने सार्‍या जगावर हुकूमत गाजविण्याचा काळ आता मागे पडलेला आहे, असे चीनच्या ब्रिटनमधील दूतावासाने म्हटले आहे. छोटा असो वा मोठा, सामर्थ्यशाली असो वा दुबळा, गरीब असो किंवा श्रीमंत, सारेच देश एकसमान आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवहार सर्वच देशांच्या सहमतीने चालविले जावे, अशी आदर्शवादी भूमिका चीनच्या दूतावासाने स्वीकारल्याचे चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

‘जी7’वर टीकाचीनकडून आलेली ही प्रतिक्रिया हा देश जी7च्या एकजुटीमुळे असुरक्षित बनल्याचे दाखवून देत आहे. यावेळी लंडनमध्ये झालेल्या जी7 परिषदेला भारत, दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया या देशांना आमंत्रित करण्यात आले होते. या तिन्ही देशांबरोबर सध्या चीनचा वाद सुरू आहे. विशेषतः जी7 परिषदेच्या आधी भारतातील चीनच्या राजदूतांनी शांतता व सहकार्याची भाषा सुरू केली होती. भारत व चीनमध्ये संघर्ष नको, सहकार्य हवे, असे चीनच्या राजदूतांनी म्हटले होते. जी7 सुरू होण्याच्या आधी चीनने लावलेला हा समजुतीचा सूर लक्षवेधी ठरतो, असे विश्‍लेषकांचे म्हणणे होते.

कोरोनाची साथ चीनने जाणीवपूर्वक पसरविली, असा थेट आरोप अद्याप जी7च्या कुठल्याही सदस्यदेशाने केलेला नाही. मात्र कोरोनाच्या विषाणूबाबत चीन करीत असलेले दावे आता स्वीकारता येणार नाही, हे जी7चे सदस्यदेश स्पष्टपणे सांगत आहेत. तसेच आत्तापर्यंत या मुद्यावर चीनची बाजू उचलून धरून या देशाचा बचाव करणार्‍या जागतिक आरोग्य संघटनेचे दावे देखील जी7चे सदस्यदेश स्वीकारायला तयार नाहीत. कोरोनाच्या उगमाबाबत सखोल तपासाची गरज आहे आणि यासाठी चीनने सहकार्य करावे, अशी मागणी जी7ने केली आहे. चीन याबाबत पारदर्शक भूमिका स्वीकारत नसल्याचे सांगून जी7च्या सदस्यदेशांनी चीनवर संशय व्यक्त केला आहे. याचे दडपण चीनला जाणवू लागले आहे. पुढच्या काळात कोरोनाच्या साथीबाबत अधिक माहिती समोर आली, तर चीनला धारेवर धरण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी जी7च्या या बैठकीत झाल्याचे दिसते. याची पूर्वकल्पना आल्याने चीन आपल्या बचावाची तयारी करीत आहे.

दरम्यान, बिल्ट बॅक बेटर वर्ल्ड अर्थात बी3डब्ल्यू या जी7ने स्वीकारलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासप्रकल्पांमुळे चीनला आपल्या बीआरआय प्रकल्पाची चिंता वाटू लागली आहे. जी7चा हा प्रकल्प चीनला लक्ष्य करणारा?आहे. पुढच्या काळात आपल्या भांडवलाचा वापर करून चीन गरीब देशांना आपल्या कर्जाच्या फासात अडकवू शकणार नाही, याची तजवीज जी7कडून केली जात असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. याचा फार मोठा धक्का चीनच्या गुंतवणुकीला व पर्यायाने अर्थव्यवस्थेला बसू शकेल.

जगभरातील प्रमुख देशांची आपल्या विरोधात होत असलेली एकजूट चीनला अधिक आक्रमक बनण्यास भाग पाडेल, असा दावा काही जबाबदार विश्‍लेषकांकडून केला जातो. मात्र चीनच्या या आक्रमकतेवर प्रतिक्रिया उमटतील, असा इशारा विश्‍लेषक देत आहेत.

leave a reply