एलएसीवरील अपयश दडविण्यासाठी चीनने भारताविरोधातील प्रचारयुद्धाची तीव्रता वाढविली

नवी दिल्ली – एलएसीवर प्रचंड प्रमाणात लष्करी तैनाती करूनही भारतीय सैन्यावर दबाव टाकण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या चीनने आपले प्रचारयुद्ध अधिकच तीव्र केल्याचे दिसते. लडाखच्या एलएसीजवळ तैनात असलेले चीनचे जवान नृत्य करीत असल्याचे दाखविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी ‘कूल अँड क्यूट’ अशी प्रतिक्रिया दिली. मात्र या व्हिडिओची भारतीय नेटकरांनी जबरदस्त खिल्ली उडविली असून चीनच्या प्रचारयुद्धाला सणसणीत प्रत्युत्तर दिले.

एलएसीवरील अपयश दडविण्यासाठी चीनने भारताविरोधातील प्रचारयुद्धाची तीव्रता वाढविलीगेल्या काही महिन्यांपासून लडाख ते अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर चीन आपण बरेच काही घडवित असल्याचा आव आणत आहे. अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर चीनच्या लष्कराने गाव वसविल्याचा प्रचार सुरू केला आहे. याद्वारे भारतीय लष्कराविरोधात आपण फार मोठी आघाडी घेतल्याचे चित्र चीनला उभे करायचे आहे. हा चीनच्या प्रचारयुद्ध तसेच मानसिक दबावतंत्राचा भाग असल्याची बाब लपून राहिलेली नाही. याची गंभीर दखल भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी घेतली होती.

लडाखच्या एलएसीवर भारत व चीनच्या लष्कराची चकमक झाली आणि त्यानंतर संतापलेल्या चीनने अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवरील भारताच्या भूभागात गाव वसविला, असा आभास निर्माण केला जात आहे. पण त्यात तथ्य नाही. चीनच्या या प्रचारतंत्राला बळी पडू नका, कारण चीनला तेच अपेक्षित आहे. भारताची इंचभर भूमीही चीनच्या हाती पडलेली नाही, असे जनरल रावत म्हणाले होते. चीन गाव वसण्याची तयारी करीत असलेला अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवरील हा भाग १९५९ सालापासून चीनच्याच कब्जात आहे, याची माहिती भारतीय सैन्यातील सूत्रांनी दिली होती.

एलएसीवरील अपयश दडविण्यासाठी चीनने भारताविरोधातील प्रचारयुद्धाची तीव्रता वाढविलीया एकाच घटनेमुळे चीन भारतीय सैन्यावर दबाव वाढविण्यासाठी जीवाचे रान करीत असल्याचे उघड झाले होते. यानंतर लडाखच्या एलएसीवर तैनात असलेले चीनचे जवान नृत्य करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला असून याद्वारे चीनचे जवान लडाखच्या हिवाळ्यातही सुस्थितीत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देऊन या व्हिडिओला प्रसिद्धी मिळेल, याची तजवीज केली आहे. पण प्रत्यक्षात लडाखच्या एलएसीवर चिनी जवानांची अवस्था बिकट बनलेली आहे. लडाखचा हिवाळा हे चीनच्या जवानांसाठी फार मोठे संकट असल्याचा दावा केला जातो.

गेल्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता, चीनच्या लष्कराने लडाखच्या हिवाळ्याला तोंड देण्याची तयारी केलेली असली तरी चीनचे जवान या हवामानाशी अजूनही जुळवून घेऊ शकलेले नाही, हे वारंवार उघड होत आहे. अशा परिस्थितीत आपले जवान उत्तम स्थितीत असल्याचे दाखविणे ही चीनची गरज बनली आहे. मात्र चीनच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर भारतीयांनी चांगलीच खिल्ली उडविली. सध्या भारतात लग्नचा सिझन सुरू आहे. त्यासाठी नाच करणार्‍या चिनी जवानांना मागणी येऊ शकते, असा शेरा भारतीय लष्कराच्या माजी अधिकार्‍याने मारला आहे.

leave a reply