चीनची ‘हायपरसोनिक मिसाईल टेस्ट’ म्हणजे ‘स्पुटनिक’सदृश घटना

- अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनने केलेली हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी ही ‘स्पुटनिक’शी तुलना होईल, अशी धक्कादायक घटना असल्याचा इशारा अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी दिला. जनरल मिले यांच्यापाठोपाठ अमेरिकेचे संरक्षणदल उपप्रमुख जनरल हायटन यांनीही, चीनच्या हायपरसोनिक चाचणीवर चिंता व्यक्त केली असून, चीनने या तंत्रज्ञानाच्या जवळपास १०० चाचण्या केल्याचा दावा केला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या वरिष्ठ सिनेटरनी चीनने केलेल्या चाचण्यांच्या मुद्यावर, संसदेने संरक्षण विभाग व गुप्तचर यंत्रणांबरोबर तातडीने एक बैठक आयोजित करावी, अशी मागणीही केली होती.

गेल्या आठवड्यात, ब्रिटनच्या ‘फायनान्शिअल टाईम्स’ने चीनने केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या चाचण्यांचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात चीनने दोन हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. पहिली चाचणी जुलै व दुसरी चाचणी ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली, असे ‘फायनान्शिअल टाईम्स’ने प्रसिद्ध केले होतेे. पहिली चाचणी २७ जुलैला घेण्यात आली असून, त्यात ‘हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल’चा वापर करण्यात आल्याचे नमूद केले आहे.

दुसरी चाचणी १३ ऑगस्टला घेण्यात आली. या दोन्ही चाचण्यांमध्ये चिनी क्षेपणास्त्राने पृथ्वीच्या भ्रमणकक्षेतून (लो ऑर्बिट) प्रवास केल्याचेही समोर आले आहे. दोन्ही चाचण्या अमेरिकी यंत्रणांना सुगावा लागू न देता झाल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी चाचण्यांदरम्यान चिनी क्षेपणास्त्रांनी दाखविलेली क्षमता अमेरिकी यंत्रणांना चकित करणारी ठरल्याचा दावाही वृत्तपत्राने केला होता. अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिलेला इशारा त्याला दुजोरा देणारा ठरतो.

‘चीनने केलेली हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी तंत्रज्ञानाच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाची घटना ठरते. ही घटना स्पुटनिकप्रमाणेच आहे का हे नक्की सांगता येणार नाही, पण त्याच्या खूपच जवळ जाणारी आहे. चीनने विकसित केलेले क्षेपणास्त्र ही अत्यंत चिंतेची बाब ठरते’, असा इशारा जनरल मार्क मिले यांनी दिला. मिले यांनी ‘स्पुटनिक’चा केलेला उल्लेख लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. १९५७ साली रशियाने अमेरिकेला चकित करीत ‘स्पुटनिक’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला होता. ही घटना दोन देशांमध्ये अंतराळस्पर्धा सुरू करणारी घटना ठरली होती.

जनरल मिले यांच्यापाठोपाठ संरक्षणदलांच्या उपप्रमुखांनीही चीनची चाचणी गंभीर बाब असल्याचे बजावले. जनरल जॉन हायटन यांनी एका बैठकीत चीनने हायपरसोनिक तंत्रज्ञान व क्षेपणास्त्राच्या १००हून अधिक चाचण्या केल्याची जाणीव करून दिली. अमेरिकेने गेल्या पाच वर्षात हायपरसोनिक तंत्रज्ञानाच्या नऊच चाचण्या केल्या आहेत; ही गोष्ट लक्षात घेतली तर चीनच्या चाचण्या किती चिंतेची बाब आहे, हे लक्षात येईल, असे हायटन म्हणाले. ज्या वेगाने चीन पुढे जात आहे, ते बघता ते अमेरिका व रशियालाही काही काळातच मागे टाकतील, असा दावाही संरक्षणदलांच्या उपप्रमुखांनी केला.

अमेरिकेतील आघाडीची संरक्षण कंपनी ‘रेथॉन’नेही चीनच्या प्रगतीकडे लक्ष वेधले. हायपरसोनिक तंत्रज्ञानात अमेरिका चीनच्या तुलनेत अनेक वर्षे पिछाडीवर आहे, असे कंपनीच्या प्रमुखांनी सांगितल्याचे समोर आले आहे.

leave a reply