जपानच्या सागरी हद्दीतील चीनची घुसखोरी वाढली

टोकिओ – जपानच्या संसदेत चिनी राष्ट्राध्यक्षांच्या संभाव्य दौऱ्याचा मुद्दा चर्चेत असतानाच चीनने जपानच्या सागरी हद्दीतील घुसखोरीची व्याप्ती अधिक वाढविण्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसात चीनच्या चार गस्ती नौका सुमारे ७० तास जपानच्या सागरी हद्दीत होत्या, अशी माहिती जपानच्या तटरक्षक दलाकडून देण्यात आली. चीनकडून गेली काही वर्षे जपानच्या हद्दीत सातत्याने घुसखोरी सुरू असली तरी इतक्या दीर्घ कालावधीसाठी चिनी नौकांनी जपानच्या हद्दीत वावरण्याची ही पहिलीच घटना आहे.

Japan-Chinaचीनच्या दोन गस्ती नौकांनी पहिल्यांदा गुरुवारी जपानच्या हद्दीतील सेंकाकू बेटांजवळ घुसखोरी केली. जपानच्या तटरक्षक दलासह इतर यंत्रणांकडून मिळालेल्या इशाऱ्यानंतरही या चिनी नौका ३० तासांहून अधिक वेळ जपानच्या सागरी हद्दीत होत्या. त्यानंतर शनिवारी पहाटे पुन्हा चीनच्या दोन गस्ती नौकांनी जपानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली. त्यानंतर या दोन चिनी नौका जवळपास ३९ तासांहून अधिक काळ सेंकाकू बेटांच्या परिसरात वावरत होत्या. एकापाठोपाठ एक घुसखोरीचे प्रयत्न करून जवळपास ७० तास जपानच्या सागरी हद्दीत राहण्याची चिनी नौकांची ही पहिलीच वेळ मानली जाते.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून आपल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जोरदार धडपड सुरू आहे. त्यासाठी विविध भागांमध्ये लष्करी तैनाती वाढवितानाच वादग्रस्त भागांमध्ये घुसखोरीचे प्रयत्नही चीनकडून सुरू आहेत. जपाननजीक असलेल्या ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात चीनकडून सातत्याने युद्धनौका, लढाऊ विमाने, पाणबुड्या व गस्ती नौकांच्या सहाय्याने घुसखोरी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच जपानच्या ‘ओशिमा आयलंड’ जवळ चीनची प्रगत पाणबुडी धोकादायकरित्या वावरत असल्याचे आढळले होते.

Japan-Chinaजपानी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या गस्ती नौका गेले ८४ दिवस सातत्याने जपानच्या ईस्ट चायना सी मधील हद्दीत घुसखोरी करीत आहेत. मात्र यापूर्वीच्या काळात चिनी नौका घुसखोरी करून काही तासातच माघारी जात होत्या. पण आता चीनने हा कालावधी जाणीवपूर्वक वाढविल्याचे दिसत आहे. त्यामागे ईस्ट चायना सीसह सेंकाकू बेटांवरील आपला दावा अधिक भक्कम करण्याची योजना असल्याचे जपानी विश्लेषकांचे मत आहे. नुकत्याच झालेल्या घुसखोरीमागे हॉंगकॉंग मुद्द्यावर जपानने घेतलेली भूमिका आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दौऱ्यावरून जपानच्या संसदेत सुरू असलेली चर्चा कारणीभूत असू शकते, असा दावाही जपानी प्रसारमाध्यमांनी केला आहे.

चीनकडून सातत्याने सुरू असलेले घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यासाठी जपानने ‘ईस्ट चायना सी’मध्ये प्रगत युद्धनौका व क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. पण त्यानंतरही चीनची घुसखोरी सुरूच असून त्यामुळे या क्षेत्रात जपान व चीनमधील तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply