‘डोलकाम’साठी चीन भूतानवर प्रचंड प्रमाणात दडपण टाकत आहे

नवी दिल्लीतील अभ्यासगटाचा इशारा

नवी दिल्ली – ‘डोकलाम’च्या सीमेबाबत भूतानने आपली भूमिका बदलावी, यासाठी चीन प्रचंड प्रमाणात दडपण टाकत आहे. चीनवर अधिसत्ता गाजवणाऱ्या ‘चायनिज कम्युनिस्ट पार्टी’ (सीसीपी) यासाठी आक्रमक बनलेली आहे. मात्र चीनच्या प्रभावाखाली येऊन भूतानने चीनधार्जिणे धोरण स्वीकारले तर त्याचे भयंकर परिणाम भूतानला भोगावे लागतील. चीनच्या फासात अडकला तर भूतान आपला भूभाग गमावेल आणि भूतानची अर्थव्यवस्थाही रसातळाला जाईल, असा इशारा नवी दिल्लीतील ‘रेड लँटर्न ॲनालिटिका’ (आरएलए) या अभ्यासगटाने दिला आहे.

Dolkaamदोन आठवड्यांपूर्वी भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी डोकलामच्या वादाचा उल्लेख करून यात भारताइतकेच चीनच्याही भूमिकेला महत्त्व असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. भूतान, भारत व चीनची सीमा डोकलाममध्ये भिडलेली आहे. २०१७ साली चीनच्या लष्कराने भूतानच्या भूभागात शिरकाव करून इथे बांधकाम सुरू केले होते. मात्र भारतीय सैन्याने चीनचा हा डाव हाणून पाडला. यामुळे संतापलेल्या चीनने भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या होत्या. त्याची पर्वा न करता भारताने भूतानचे संरक्षण केले होते. भारतीय सैन्याने दाखविलेला कणखरपणा तसेच राजनैतिक पातळीवर भारताने चीनच्या विरोधात दाखविलेली धमक, हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला होता.

यामुळे बसलेल्या धक्क्यातून सावरून चीनने पुढच्या काळात भूतानशी परस्पर चर्चा करण्याच्या योजनेवर काम सुरू केले. भारत व भूतानमध्ये झालेल्या करारानुसार भूतान परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर भारतावर अवलंबून आहे. पण चीनने भारताला डावलून भूतानशी वाटाघाटी सुरू केल्या. तसेच या देशावर प्रचंड प्रमाणात दडपण टाकले. दोन आठवड्यांपूर्वी भूतानच्या पंतप्रधानांनी चीनच्या बाजूने केलेली विधाने म्हणजे भूतानमधील चीनचा हस्तक्षेप दाखवून देत असल्याचा दावा भारताच्या विश्लेषकांनी केला होता. भारताने त्याची गंभीर दखल घेतली होती.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालय तसेच मुत्सद्यांनी आणि सरकारी माध्यमांनी भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी केलेल्या विधानांचे जोरदार स्वागत केले. त्यांची ही विधाने भारताल चपराक लगावणारी असल्याचा दावा या सर्वांनी केला होता. पण काही दिवसातच चीनचा उत्साह मावळला. कारण भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचूक भारताच्या भेटीवर आले आणि त्यांनी भारताबाबतची भूतानची भूमिका बदललेली नाही, असा खुलासा केला.

या पार्श्वभूमीवर, भूतानला चीनपासून संभवणाऱ्या धोक्याकडे ‘रेड लँटर्न ॲनालिटिका’ने (आरएलए) लक्ष वेधले आहे. चीन फार आधीपासून भूतानचा भूभाग आपला असल्याचा आभास निर्माण करीत आहे. आता भूतानवर चीनची सीसीपी प्रचंड प्रमाणात दडपण वाढवून आपल्याला अनुकूल भूमिका स्वीकारण्यासाठी हालचाली करीत आहे. मात्र जर का भूतान चीनच्या या सापळ्यात अडकला, तर त्याचे भयंकर परिणाम पुढच्या काळात भूतानला भोगावे लागतील, असा इशारा ‘आरएलए’ने दिला आहे.

चीनबरोबरील जवळिकीमुळे भूतानला आपला भूभाग गमवावा लागेल. तसेच चीनचे निकटतम मित्रदेश असलेल्या पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका या देशांच्या अर्थव्यवस्थांची दैना उडाली आहे, याची जाणीव ‘आरएलए’ने करून दिली. हे देश चीनच्या भुलथापांना बळी पडून कर्जाच्या सापळ्यात अडकले आणि त्यामुळे हे देश कंगाल बनले आहेत, याकडे आरएलएने लक्ष वेधले. ही बाब लक्षात घेऊन भूतानने चीनपासून सावध रहावे. भूतानसारख्या अत्यंत छोट्या देशाने चीनसारख्या बलाढ्य देशाशी व्यवहार करताना छोटी चूक केली तरी ते अतिशय महाग पडेल, असे आरएलएने बजावले आहे.

leave a reply