तैवान, हाँगकाँग, तिबेट व झिंजियांगचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या ‘जी7’वर चीनचे जोरदार टीकास्त्र

बीजिंग – आपल्या झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांवरील अत्याचारांबरोबरच, तैवानच्या विरोधातील आक्रमक कारवाया चीनने त्वरित बंद कराव्या, अशी मागणी विकसित देशांच्या जी7 संघटनेने केली होती. अपेक्षेनुसार त्यावर चीनची तीव्र प्रतिक्रिया आली आहे. जी7 देशांनी आपली बॉम्बर विमाने आणि युद्धनौका दुसऱ्या देशाच्या सीमेनजिक तैनात करू नये आणि इतरांवर निर्बंध लादू नयेत, असा पलटवार चीनने केला आहे.

अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान या औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या जी7 देशांनी चीनच्या वर्चस्ववादी करवायांवर चिंता व्यक्त करणारे निवेदन रविवारी प्रसिद्ध केले हेोते. यात चीन आपल्या झिंजियांग प्रांतातील उघूरवंशयांवर करीत असलेल्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. याबरोबरच हाँगकाँग आणि तैवानबाबतच्या चीनच्या धोरणावर जी7ने गंभीर प्रश्न उपस्थित केले. साऊथ व ईस्ट चायना सीच्या क्षेत्रातील चीनचे धोरण धोकादायक पातळीवर गेल्याची नोंदही यात करण्यात आलेली आहे. अशारितीने चीनने धमक्या, धोकादायक कारवाया आणि इतरांना आव्हाने देण्याचे धोरण सोडून द्यावे, अशी मागणी जी7ने या निवेदनात केली होती. तसेच चीनने झिंजियांग व तिबेटमध्ये तटस्थ निरिक्षकांना पाहणीची परवानगी द्यावी, असे आवाहनही जी7ने केले होते.

अपेक्षेनुसार यावर चीनकडून जहाल प्रतिक्रिया उमटली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी जी7च्या या निवेदनाचा निषेध नोंदविला. हाँगकाँग व तैवानबाबतचे आपल्या देशाचे धोरण सुस्पष्ट आहे, त्यात बदल होणार नाही, असा इशारा लिजिआन यांनी दिला आहे. इतकेच नाही तर चीनला उपदेश करणाऱ्या जी7ने दुसऱ्या देशांच्या सीमेजवळ आपली बॉम्बर विमाने व युद्धनौका तैनात करण्याचे थांबवावे, असा टोला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी लगावला. तसेच इतर देशांवर निर्बंध लादण्याच्या कारवायाही जी7ने रोखाव्या अशी मागणी लिजिआन यांनी केली आहे.

दरम्यान, युक्रेनचे युद्ध भडकलेले असताना, अमेरिका व पाश्चिमात्य देशांचे सारे लक्ष या युद्धाकडे केंद्रीत झालेले आहे. याचा लाभ घेऊन चीन तैवानवर हल्ला चढविल, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषक सातत्याने देत आहेत. चीनने देखील तैवानच्या हवाई हद्दीतील घुसखोरीची तीव्रता वाढवून यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंतेत भर घातली आहे. त्याचे प्रतिबिंब जी7 देशांच्या निवेदनात उमटले असून जी7ने चीनच्या आक्रमक कारवायांवर नेमके बोट ठेवल्याचे दिसत आहे. तैवान, हाँगकाँग, झिंजियांग व तिबेट यासारखे चीनसाठी अतिशय संवेदनशील असलेले मुद्दे उपस्थित केल्याने, कमालीचा अस्वस्थ झालेल्या चीनने जी7वर सडकून टीका करून आपला संताप व्यक्त केल्याचे दिसत आहे.

leave a reply