दक्षिण कोरियन जनतेसाठी चीन हा सर्वात नावडता देश

नावडता देशसेऊल/बीजिंग – लष्करी व आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर छोट्या तसेच शेजारी देशांना धमकावणाऱ्या चीनची प्रतिमा दिवसेंदिवस अधिकच डागाळत असल्याचे समोर आले आहे. शेजारी देश असणाऱ्या दक्षिण कोरियात नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल 58 टक्के नागरिकांनी चीन नावडता देश असल्याचे म्हटले आहे. काहींनी तर चिनी राजवट जवळपास सैतानाप्रमाणेच असल्याची प्रतिक्रिया दिल्याचा दावाही सर्वेक्षणात करण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातही जगातील 17 प्रमुख देशांमध्ये चीनची प्रतिमा नकारात्मक असल्याचे समोर आले होते.

दक्षिण कोरिया पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कोरोना, उत्तर कोरिया, घरांच्या किंमती यासह अजून एक मुद्दा ऐरणीवर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. हा मुद्दा चीनचा असून राष्ट्राध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांकडून यासंदर्भात करण्यात आलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत. याच पार्श्‍वभूमीवर, दक्षिण कोरियातील सर्वेक्षण करणारी आघाडीची कंपनी ‘हॅन्कूक रिसर्च’ व ‘सिसाइन’ या मासिकाने संयुक्त पाहणी करून जनतेचे मत जाणून घेतले.

नावडता देशया अहवालात, दक्षिण कोरियाच्या 58 टक्के नागरिकांनी चीन हा सर्वाधिक नावडता देश असल्याचे म्हटले आहे. चीनच्या राजवटीचा उल्लेखही ‘क्लोज टू इव्हिल’ असा करण्यात आला आहे. यामागे तरुण वर्गाचा सर्वाधिक सहभाग असल्याचे ‘हॅन्कूक रिसर्च’कडून सांगण्यात आले. ‘आतापर्यंत जपानचा द्वेष करणे हा दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय ओळखीचा भाग होता. आमच्या सर्वेक्षणात 40 वर्षे व त्यावरील वयोगटातील अनेक नागरिकांनी ते अजूनही जपानचाच द्वेष करीत असल्याचे म्हटले आहे. मात्र 20 ते 30 वर्षे वय असणारी तरुण पिढी चीनचा सर्वाधिक द्वेष करीत असल्याचे समोर आले आहे’, याकडे ‘हॅन्कूक रिसर्च’चे विश्‍लेषक जिआँग हॅन-वूल यांनी लक्ष वेधले. ‘चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे परराष्ट्र धोरण व एकाधिकारशाहीची राजवट मुक्त समाजासाठी धोका असल्याचे कोरियन युवा पिढीला वाटते. कोरोनाची हाताळणी, साऊथ चायना सीमधील विस्तारवादी कारवाया व चीनमधून होणारे प्रचंड प्रदूषण हेदेखील कोरियन तरुणाईला नाराज करणारे घटक आहेत’, असा दावा ‘हॅन्कूक रिसर्च’च्या विश्‍लेषकांनी केला आहे. अमेरिका व चीनची तुलना करताना, कोरियन नागरिकांनी अमेरिकेला ‘सिक्स टू वन’ असा कौल दिल्याचेही सर्वेक्षणात सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व कम्युनिस्ट राजवट प्रसारमाध्यमांसह विविध मार्गांचा अवलंब करून चीन जागतिक महासत्ता असल्याची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रेमळ व विनम्र देश अशी चीनची प्रतिमा तयार करा, असा संदेशही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकताच दिला होता. मात्र प्रत्यक्षात चीनची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक खराब होत चालल्याचे विविध सर्वेक्षणांमधून समोर येऊ लागले आहे. कोरोनाची साथ, हाँगकाँग, उघुरवंशियांवरील अत्याचार व साऊथ चायना सी यासारख्या मुद्यांवरून आंतरराष्ट्रीय समुदायात तीव्र नाराजीची भावना असून दक्षिण कोरियन जनतेची प्रतिक्रिया त्याला दुजोरा देणारी दिसत आहे.

leave a reply