एलएसीवरील तणाव कमी करण्याची जबाबदारी चीनवरच

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली/बीजिंग – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या अधिकार्‍यांमधील चर्चेची 12 वी फेरी सुरू होत आहे. त्याच्या आधी, भारताबरोबरील संबंध सुधारण्याची जबाबदारी आता चीनवरच आहे, याची जाणीव परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी करून दिली. लडाखच्या एलएससीजवळील लष्करी तैनाती चीनने अजूनही पूर्णपणे मागे घेतलेली नाही. इथून आपले जवान मागे घेण्याचे चीनने लिखित स्वरुपात मान्य केले होते, याची आठवण भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली. तर या क्षेत्रातील आपली तैनाती बचावात्मक असून घुसखोरी रोखण्यासाठी असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. तसेच भारताने सीमावादाचा द्विपक्षीय सहकार्याशी संबंध जोडू नये, अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

एलएसीवरील तणाव कमी करण्याची जबाबदारी चीनवरच - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरलडाखच्या एलएसीजवळील काही भागांमध्ये अजूनही चिनी लष्कराची तैनाती कायम आहे. इथून लष्कर मागे घेण्याचे लिखित स्वरुपात आश्‍वासन चीनने दिले होते, त्याला चीन बांधिल आहे, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली. भारताच्या यासंदर्भातील संवेदनशीलतकडे चीनला दुर्लक्ष करता येणार नाही, असे परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला बजावले आहे. तसेच चीनने इथून आपले जवान माघारी घेतल्याखेरीज इथला तणाव कमी होणार नाही व भारताबरोबरील संबंधही सुरळीत होणार नाही, असे संकेत जयशंकर यांनी दिले आहेत. त्यामुळे एलएसीवरील तणाव कमी करून भारताबरोबर सौहार्द प्रस्थापित करण्याची जबाबदारी आता चीनचीच आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बजावले. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली.

लडाखच्या एलएसीजवळील चीनची तैनाती बचावात्मक असून हा नेहमीच्या तैनातीचा भाग ठरतो. इतरांनी घुसखोरी करून नये, यासाठी ही तैनाती असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन म्हणाले. त्याचवेळी सीमावाद शांतीपूर्ण वाटाघाटीने सोडविला जावा व त्याचा द्विपक्षीय सहकार्यावर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा लिजिआन यांनी व्यक्त केली. त्यामुळे भारत व चीन लडाखच्या एलएसीवरील तणावाबाबत आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे. सीमेवर हजारो जवान तैनात ठेवून चीन भारताकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी याआधी अनेकवार बजावले होते. तर सीमावादाचा द्विपक्षीय सहकार्यावर परिणाम होऊ देऊ नका, असे चीन भारताला सांगत आहे. इतकेच नाही तर दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांच्या चर्चेतही लडाखच्या एलएसीचा विषय वजा करण्याची मागणी चीन करीत आहे. त्याऐवजी स्थानिक लष्करी अधिकार्‍यांनी वाटाघाटीतून ही समस्या सोडवावी, असे चीनचे म्हणणे आहे.

यामुळे उभय देशांच्या अधिकार्‍यांमधील चर्चेची 12 वी फेरी देखील निष्फळ ठरण्याची दाट शक्यता आहे. मात्र या चर्चेआधी भारतानेच आपल्या भूभागात घुसखोरी केली, असा कांगावा चीनने सुरू केला आहे. भारत ‘सलामी स्लायसिंग’चा वापर करून चीनच्या भूभागात आपले सैन्य घुसवित असल्याचा आरोप चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने नुकताच केला होता. त्याचवेळी गेल्या वर्षी झालेल्या गलवानच्या संघर्षात जखमी झालेल्या चिनी लष्करी अधिकार्‍याने आपल्या देशाची भूमी भारताच्या हाती पडू देण्यापेक्षा आपण मरण पत्करू, असे दावे चिनी वृत्तवाहिन्यांवर केले होते. यामुळे सीमावादाबाबत चीनची भाषा पूर्णपणे बदलल्याचे दिसत आहे.

leave a reply