चर्चेच्या फेरीनंतर चीनकडून भारताला चिथावणीखोर संदेश

 संदेशनवी दिल्ली – चीनबरोबरील सीमेवर सौहार्द प्रस्थापित करण्याबाबत मिळत असलेले सकारात्मक संदेशांचे भारताकडून स्वागत होईल, अशी अपेक्षा चीनच्या लष्कराने व्यक्त केली आहे. लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांच्या चर्चेची ११ वी फेरी नुकतीच पार पडली होती. या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झालेले नाही. अशा परिस्थितीत इथला तणाव वाढत नाही, ही भारतासाठी सकारात्मक बाब असल्याचा संदेश चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’कडून (पीएलए) दिला जात आहे. इथल्या वादात आपली सरशी होत असल्याचे पीएलए दाखवू पाहत आहे. पण प्रत्यक्षात लडाखच्या एलएसीवर भारतीय लष्कर वर्चस्व गाजवित असल्याची बाब याआधी अनेकदा समोर आली होती.

९ एप्रिल रोजी भारत व चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चेची ११ वी फेरी पार पडली. या चर्चेत चीनने लडाखच्या गोग्रा, हॉट स्प्रिंग, डेप्सांग या क्षेत्रातून माघार घ्यावी, अशी मागणी भारताने केली होती. पण चीनच्या लष्करी अधिकार्‍यांनी याबाबत ताठर धोरण स्वीकारले होते. त्यामुळे ही चर्चा पुढे सरकू शकली नाही. यामुळे सदर चर्चेनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केलेले नाही. ही बाब चर्चा सकारात्मक नव्हती, हे दाखवून देत आहे. अशा परिस्थितीत चीनच्या पीएलएने शेरेबाजी करणारे निवेदन प्रसिद्ध केले. चीनबरोबरील सीमेवरील तणाव कमी करून शांतता प्रस्थापित करण्याबाबत मिळत असलेल्या सकारात्मक संदेशांचे भारताकडून स्वागत होईल, अशी अपेक्षा असल्याचे पीएलएने या निवेदनात म्हटले आहे.

वेगळ्या शब्दात चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सकडून केला जाणारा प्रचार पीएलएने वेगळ्यारितीने मांडला आहे. लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करणे भारताच्याच हिताचे आहे, कारण त्यामुळे भारताचेच अतोनात नुकसान होईल, अशा धमक्या ग्लोबल टाईम्ससारखे चीनचे मुखपत्र अनेकवार देत आले आहे. तसाच संदेश देण्याचा प्रयत्न पीएलएने केल्याचे दिसते. तसेच यामुळे लडाखच्या एलएससीजवळून आपण लष्कर माघारी घेणार नाही, असे संकेत पीएलएने दिले आहेत. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये पार पडलेली चर्चेची ही ११ वी फेरी देखील निष्फळ ठरेल, याची पूर्वकल्पना भारताला होती.

चीन लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रातून इतक्यात माघार घेणार नाही व इथल्या तैनातीचा भारतावर दडपण टाकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करील, असा इशारा माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषकांनी वेळोवेळी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर, भारताने लडाखच्या एलएसीवर संपूर्ण तयारी केली आहे. चीनच्या आगळिकीला त्याच भाषेत उत्तर देताना भारत कचरणार नाही, याची जाणीव वेगवेगळ्या मार्गाने चीनला करून दिली जात आहे. लडाखच्या एलएसीवर चीनचे नाही तर भारताचे लष्कर वर्चस्व गाजवित आहे, असे देशाच्या नेत्यांनी व लष्करी अधिकार्‍यांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते.

पण आक्रमकतेचे प्रदर्शन आणि खोटानाटा प्रचार याचा वापर करून चीन लडाखच्या एलएसीवर आपल्या लष्कराची सरशी होत असल्याचे भ्रामक चित्र उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. लडाखच्या एलएसीवर गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या वाद आणि संघर्षात भारताने दाखविलेल्या कणखरपणामुळे चीनच्या सामर्थ्यशाली देश या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. यानंतरच्या काळात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातले छोटे देश देखील चीनच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस दाखवू लागले आहेत. तसेच या देशांनी चीनच्या विरोधात भारताकडून सहाय्याची अपेक्षा ठेवली आहे.

क्वाडचे सदस्यदेश असलेल्या जपान व ऑस्ट्रेलियाचा भारतावरील विश्‍वास लडाखच्या एलएसीवर भारताने दाखविलेल्या निग्रहामुळे अधिकच दृढ झाला आहे. अशा परिस्थितीत चीन लडाखच्या एलएसीवरून माघार?घेऊन आपली अधिक अप्रतिष्ठा करू इच्छित नाही. उलट या वादात आपण जिंकल्याचे चीनला सार्‍या जगाला दाखवायचे आहे. पण त्यासाठी भारताशी उघडपणे वैर घेण्याची जोखीमही चीनला पत्करायची नाही. म्हणूनच चीनने लडाखच्या पँगॉंग सरोवर क्षेत्राच्या उत्तर व दक्षिणेकडून चीनने लष्कर माघारी घेतले होते. पण ही माघारीची प्रक्रिया पूर्ण न करता चीन आपण या ठिकाणी हटून बसल्याचे दाखवून देत आहे.

मात्र या प्रयत्नातून चीनच्या हाती फारसे काही लागण्याची शक्यता नाही. कारण गेल्या वर्षी झालेल्या गलवानच्या संघर्षात हल्लेखोर चीनला फार मोठी हानी सहन करावी लागली होती. याच्या बातम्या दडपण्याचा शक्य तितका प्रयत्न चीनने करून पाहिला. कालांतराने चीनला या संघर्षात आपले जवान गमावल्याचे मान्य करावे लागले होते. पण त्यांची संख्या भारतापेक्षा खूपच कमी होती, हे दाखविण्याची धडपड चीनने केली होती. म्हणूनच चीन लडाखच्या एलएसीबाबत करीत असलेल्या दाव्यांना व प्रचाराला काडीचीही विश्‍वासार्हता नाही.

भारत व चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अर्थात एलएसी ही स्पष्टपणे आखण्यात आलेली नाही. याचा लाभ घेऊन चीन आपले लष्कर भारताच्या हद्दीत शिरकाव करीत असल्याचे चित्र उभे करीत आहे. पण भारताची एक इंच भूमी देखील चीनच्या लष्कराच्या हाती नसल्याची ग्वाही देऊन भारताच्या लष्करप्रमुखांनी चीनच्या प्रचारयुद्धाला खणखणीत प्रत्युत्तर दिले होते.

leave a reply