अरुणाचल प्रदेशमधील ११ ठिकाणांची नावे बदलून चीनची भारताला नवी चिथावणी

बीजिंग – अरुणाचल प्रदेशमधील ११ ठिकाणांची चिनी नावे जाहीर करून चीनने पुन्हा एकदा भारताला चिथावणी दिली. रविवारी चीनच्या ‘सिव्हिल अफेअर्स’ मंत्रालयाने याची घोषणा केली. याद्वारे भारताबरोबरील संबंध सुधारून सीमावाद सोडविण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे चीनने दाखवून दिले आहे. याआधी २०१७ व २०२१ साली चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भूभाग होता व यापुढेही राहिल, चीनच्या दाव्यांचा त्यावर परिणाम होणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावेळी बजावले होते.

अरुणाचल प्रदेशमधील ११ ठिकाणांची नावे बदलून चीनची भारताला नवी चिथावणीलडाखच्या एलएसीवर सध्या शांतता असली तरी इथला वाद कधीही चिघळून त्याचे संघर्षात रुपांतर होऊ शकते, असे भारताच्या लष्करप्रमुखांनी नुकतेच बजावले होते. तसेच एलएसीवर कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचा इशारा लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी दिला होता. याबरोबरच अरुणालच प्रदेशमध्ये जी२० परिषदेशी निगडीत बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या बैठकाली चीनचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील ११ ठिकाणांची नावे बदलण्याचा चिथावणीखोर निर्णय चीनने जाहीर केला.

भारताची कुरापत काढून अरुणाचल प्रदेशवरील आपला दावा ठोकण्याचा चीनचा हा आणखी एक प्रयत्न ठरतो. भारताने ही बाब खपवून न घेता चीनला जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे विश्लेषक बजावत आहेत. भारताने आता तिबेटचा मुद्दा उपस्थित करून चीनवर दडपण वाढवायला हवे, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर चीनच्या अशा कारवायांकडे अधिक लक्ष्य देण्यापेक्षा भारताने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी अधिक योजनाबद्ध पावले उचलावी. अखेरीस ही बाब चीनवर खऱ्या अर्थाने दडपण वाढविणारी ठरेल, असे काही विश्लेषक सांगत आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व वाढविण्यासाठी चीन जबरदस्त प्रयत्न करीत असून इराण व सौदी अरेबियामध्ये समेट घडवून आणून चीनने आपला प्रभाव वाढविल्याचे दिसत आहे. त्याचवेळी रशिया व युक्रेनचे युद्ध रोखण्यासाठीही चीन प्रयत्न करीत आहे. याद्वारे चीन महासत्ता अमेरिकेची जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका काही विश्लेषकांनी ठेवला होता. अमेरिकेच्या ज्येष्ठ मुत्सद्यांनीही त्याला दुजोरा दिलेला आहे. याबरोबरच चीन आंतरराष्ट्रीय चलन म्हणून अमेरिकेच्या डॉलरच्या जागी आपल्या युआनचा वापर करण्यासाठी जोरदार हालचाली करीत आहे.

हे सारे सुरू असतानाच, चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर गंभीर संकटे खडी ठाकली आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून दुसऱ्या देशात चालल्या आहेत. त्याचवेळी भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढत चालली असून भारताशी रुपयामध्ये व्यवहार करणाऱ्या देशांचीही संख्या वाढत चालली आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व असियानचे सदस्य असलेले देश देखील भारताबरोबरील आर्थिक व सामरिक सहकार्य वाढवित आहेत. यामुळे भारताकडून आपल्याला सर्वच आघाड्यांवर आव्हान मिळत असल्याची जाणीव चीनला अस्वस्थ करत असल्याचे दिसते.

असे असले तरी इतर शेजारी देशांप्रमाणे भारताला आपल्या लष्करी बळाच्या जोरावर धमकवता येणार नाही, याची सुस्पष्ट जाणीव चीनला झालेली आहे. म्हणूनच भारताविरोधात कुरापती सुरू ठेवून भारतावर दडपण टाकण्याच्या कारवाया चीनकडून सुरू असतात. अरुणाचल प्रदेशमधील ११ ठिकाणांची नावे बदलण्याचा निर्णय चीनच्या याच कुरापतखोर कारवायांचा भाग ठरतो.

leave a reply