लडाखच्या गारठ्याने चिनी जवानांना हुडहुडी भरली – चिनी लष्कराला 90 टक्के जवानांची बदली करावी लागली

नवी दिल्ली – भारतीय सैन्याचा सामना करण्यासाठी लडाखच्या एलएसीजवळ तैनात करण्यात आलेल्या चिनी लष्कराला इथल्या हवामानालाही तोंड देणे जमलेले नाही. त्यामुळे चिनी लष्कराला इथे तैनात केलेल्या 90 टक्क्याहून अधिक जवानांना मागे घेऊन नवी तैनाती करावी लागली. चीनच्या लष्कराला दैनंदिन पातळीवर हे बदल्यांचे काम करावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चीन आपल्या सामर्थ्यशाली लष्कराबाबत करीत असलेले दावे पोकळ आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारत व चीनचे नेतृत्त्व प्रगल्भ असल्याचे सांगून हे नेते दोन्ही देशांमधील सीमावाद चिघळणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

चिनी जवानलडाखचा कडक हिवाळा चिनी जवानांसाठी अतिशय घातक ठरला. अशा हवामानाची सवय नसल्याने चिनी जवान मोठ्या प्रमाणात आजारी पडत होते. उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत होते. त्यामुळे दररोज नवी तैनाती करण्याचे काम चिनी लष्कराला करावे लागले. यासाठी रोटेशन पद्धतीचा वापर करून चीन लडाखच्या एलएसीजवळील आपली तैनाती कायम ठेवत होता. ही बाब जगासमोर येऊ नये, यासाठी चीनची धडपड सुरू होती. इथल्या कडक हिवाळ्यात चिनी जवानांकडे आवश्यक असलेले गरम कपडे व अन्न मुबलक प्रमाणात आहे. पण भारतीय सैनिकांची तशी स्थिती नाही, असे सांगून चीनचे सरकारी मुखपत्र आपल्या लष्कराची स्थिती भारतापेक्षा खूपच चांगली असल्याचा आभास निर्माण करीत होते. पण याबाबच्या बातम्या नव्याने समोर आल्याने या दाव्यातील खोडारडेपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला.

एखाद्या ठिकाणी लष्कर तैनात करण्याच्या आधी जवानांना तिथल्या हवामानासाठी तयार करण्याचे काम चिनी लष्कराकडून केले जात नाही. लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रात चिनी लष्कराला याचा फार मोठा फटका बसला. भारतीय सैन्याशी मुकाबला करणे दूर राहिले, चीनच्या लष्कराला या क्षेत्रात टिकून राहणे देखील आव्हानात्मक वाटू लागल्याचे दिसत होते. दररोज नव्याने तैनाती करून चीनला आपल्या आजारी पडलेल्या जवानांची देखभाल करावी लागत होती. यामुळे चिनी लष्कराच्या मर्यादा समोर आलेल्या आहेत. त्याचवेळी भारतीय सैनिकांची क्षमता व उच्च कोटीचे मनोबल यामुळे प्रकर्षाने समोर येत आहे.

गलवानच्या संघर्षातही भारतीय सैनिकांनी चीनच्या लष्कराची चांगलीच खोड मोडली होती. पण याबाबतची सारी माहिती दडवून ठेवणारा चीन आजही हे सारे दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या दुबईमध्ये असलेल्या एका चिनी ब्लॉगरने गलवानच्या संघर्षात चिनी लष्कराचे फार मोठे नुकसान झाल्याचा दावा केला होता. यानंतर खवळलेल्या चिनी यंत्रणांनी त्याला ताब्यात घेऊन तुरुंगात डांबले आहे. त्यामुळे चीन गलवानचे सत्य जगासमोर येऊ नये, यासाठी अजूनही धडपत असल्याचे दिसत आहे.

लडाखच्या एलएसीवरील गोग्रा व हॉट स्प्रिंग येथे तैनात असलेल्या चिनी जवानांच्या माघारीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील अधिकारी घेतील, असे चीनने म्हटले आहे. भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांच्या चर्चेत हा मुद्दा असू नये, यासाठी चीन ही मागणी करीत असल्याचे दिसते. मात्र दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांची चर्चाच लडाखच्या एलएसीवरील घुसखोरीची समस्या सोडविण्यासाठी होत आहे. त्यामुळे या चर्चेतून गोग्रा व हॉट स्प्रिंगमधील चिनी जवानांच्या तैनातीचा मुद्दा वजा करणे भारताला मान्य होणारे नाही. त्यामुळे इतक्यात तरी लडाखच्या एलएसीवरील तणाव निवळण्याची शक्यता नाही. उलट भारत एलएसीजवळील चीनच्या हालचालींकडे अधिक सावधपणे पाहत आहे.

भारताच्या संरक्षणदलप्रमुख, लष्करप्रमुख व वायुसेनाप्रमुख सातत्याने लडाखच्या एलएसीला भेट देऊन इथल्या सुरक्षेची पाहणी करीत आहेत. या क्षेत्रासाठी नवी तैनाती करून भारत चीनला सडेतोड उत्तर देत आहे. लडाखच्या एलएसीवरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी उभय देशांमधील वाद चिघळणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे दोघेही प्रगल्भ नेते आहेत. शेजारी देशांमधील हा वाद वाटाघाटींद्वारे सोडवितील. पण दुसर्‍या कुठल्याही देशाने भारत व चीनमधील वादात उडी घेऊ नये, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटले आहे.

\या आधी रशियाने भारताच्या क्वाडमधील सहभागावर नाराजी व्यक्त करून या चीनविरोधी आघाडीत भारताने सहभागी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाची ही भूमिका पुन्हा एकदा मांडली. भारताबरोबरील रशियाचे सहकार्य धोरणात्मक पातळीवरचे आहे व त्यात अर्थकारण, ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान व संरक्षण इत्यादी क्षेत्राचा समावेश आहे, याची आठवण राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी करून दिली.

leave a reply