कोरोनाच्या चाचणीसाठी चीनने युरोपिय देशांना सदोष किट्स पुरविले

माद्रिद/अंकारा – कोरोनाव्हायरसच्या तपासणीसाठी मित्रदेशांना कोट्यवधी डॉलर्स किमतीचे वैद्यकीय सहाय्य पुरविणार्‍या चीनची उपकरणे सदोष असल्याचा आरोप स्पेन, झेक प्रजासत्ताक, जॉर्जिया आणि तुर्की या देशांनी केला. चीनने पुरवलेले टेस्टिंग किट दुय्यम दर्जाचे असल्याचा ठपका या देशांनी ठेवला आहे. कोरोनाव्हायरसची साथ जगभरात फैलावत असताना, चीन सदोष वैद्यकीय साहित्यांची निर्यात करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असल्याचे आरोप सुरू झाले आहेत.

कोरोनाग्रस्तांची अचूक चाचणी करता यावी, यासाठी जगभरातील सर्वच देश प्रयत्न करीत आहेत. या प्राथमिक चाचणीसाठी आवश्यक टेस्टिंग किट तयार करण्यात आतपर्यंत फारच कमी देशांना यश मिळाले आहे. यामध्ये चीन, दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका, भारत या देशांचा समावेश आहे. यापैकी, चीन वगळता इतर देशांनी सदर किटची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू केलेली नाही. त्यामुळे चीनसाठी जागतिक बाजारपेठ खुली झाल्याचे दिसत आहे.

कोरोनाव्हायरसने हादरवून सोडणार्या युरोपमधील काही देशांनी चीनबरोबर कोट्यवधी डॉलर्सचे करार करुन हे किट्स खरेदी केले होते. यामध्ये स्पेन, झेक प्रजासत्ताक, जॉर्जिया आणि तुर्कीसारख्या चीनच्या युरोपिय मित्रदेशांचा समावेश आहे. चीनने स्पेनला साडे चार लाख टेस्टिंग किट पुरविले. तर झेक प्रजासत्ताकने चीनकडून एक लाखाहून अधिक टेस्टिंग किट खरेदी केले होते. जॉर्जिया व तुर्कीने चीनकडून किती किट खरेदी केले, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पण, चीनने पाठविलेल्या टेस्टिंग किट्सपैकी फक्त २० ते ३० टक्के किट्स कोरोनाव्हायरस विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची ओळख पटवून देत आहेत. त्यामुळे जवळपास ८० ते ७० टक्के किट्स सदोष असल्याची टीका स्पेन, झेक प्रजासत्ताक, जॉर्जिया आणि तुर्कीने केली आहे. तसेच सदर किट्स दुय्यम दर्जाचे असल्याचा आरोपही केला. या चारही देशांनी हे दुय्यम दर्जाचे किट्स चीनला परत पाठविले आहेत.

युरोपिय देशांनी केलेल्या आरोपांना चीनने बगल देण्याचा प्रयत्न केला. संबंधित वैद्यकीय अधिकार्यांनी योग्य पद्धतीने किट हाताळले नसेल, असे सांगून चीनने आरोपमुक्त होण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. तर स्पेनला किट पुरविणार्या कंपनीला आपण लायसंस पुरविले नसल्याचे कारण देऊन चीनने या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कोरोनाव्हायरसची साथ चीनमुळेच जगभरात पसरली, असे गंभीर आरोप चीनवर होत आहेत. आता या साथीची चाचणी करण्यासाठी सदोष टेस्टिंग किट्स पुरविल्याचा नवा आरोप सुरु झाल्यानंतर चीनची जगभरात अधिकच नाचक्की होत आहे.

leave a reply