दलाई लामा यांच्या लडाख भेटीमुळे चीन अस्वस्थ

नवी दिल्ली – अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीला पाच दिवस उलटले. तरीही चीन अजूनही यावरून आगपाखड करीत असून तैवानला संपविण्याचे इशारे देत आहे. पेलोसी तैवानला भेट देत असतानाच, बौद्धधर्मियांचे धर्मगुरू व तिबेटी नेते दलाई लामा यांनी लडाखला भेट दिली. हा योगायोग नसून दलाई लामा यांची ही भेट चीनवरील दबाव वाढविण्याच्या भारताच्या डावपेचाचा भाग असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Dalai-Lama-visit-Ladakhदलाई लामा लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. महिनाभर ते या दौऱ्यावर असून लेहमधून नुकतेच दलाई लामा लडाखमध्ये पोहोचले. लडाखच्या सीमेवर भारत व चीनचे पन्नास हजाराहून अधिक जवान एकमेकांसमोर खडे ठाकलेले आहेत. इथला तणाव अजूनही निवळलेला नाही. अशा परिस्थितीत भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमधून दलाई लामा लेहमधून लडाखमध्ये दाखल झाले, ही लक्षणीय बाब ठरते. गेल्या काही आठवड्यांपासून चीन या क्षेत्रातील आपल्या लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्सद्वारे चिथावणीखोर कारवाया करीत असल्याचे उघड झाले होते. भारताच्या हवाई हद्दीजवळ उड्डाण करून चीनच्या लढाऊ विमानांनी भारताच्या सज्जतेची चाचणी घेतल्याचे दावेही केले जातात.

मात्र या क्षेत्रात सज्ज असलेल्या भारतीय वायुसेनेच्या विमानांनी चिनी विमानांच्या हालचालीनंतर त्वरित हालचाली सुरू केल्या. भारतीय वायुसेनेच्या या अत्यंत कमी वेळातील ‘रिस्पॉन्स’ मुळे चीन अस्वस्थ झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यानंतर चीनने भारताची वायुसेना लडाखच्या एलएसीवर धोकादायक कारवाया करीत असल्याची तक्रार केली होती. यातून एखादी दुर्घटना होऊ शकते, असा इशाराही चीनने दिला होता. तर अशी दुर्घटना टाळायची असेल तर दोन्ही देशांच्या हवाई दलांमध्ये ‘हॉटलाईन’ प्रस्थापित करून त्याद्वारे संवाद साधण्याचा प्रस्ताव भारताने चीनला दिला होता.

सध्या तरी भारताचा हा प्रस्ताव मान्य करण्याखेरीज चीनसमोर दुसरा पर्याय नसल्याचे दिसत आहे. लडाखच्या क्षेत्राजवळच असलेल्या तिबेटमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात आपल्या हवाई दलाची विमाने, हेलिकॉप्टर्स तसेच रडारयंत्रणा तैनात केली आहे.पण चीनने कितीही प्रयत्न केले तरी या क्षेत्रात भारतीय वायुसेनेची क्षमता चीनपेक्षा कितीतरी अधिक असून चीन या आघाडीवर भारतावर मात करू शकत नाही, असे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. वायुसेना आपल्या या क्षमतेची वेळोवेळी चीनला जाणीव करून देत असून या क्षेत्रात वर्चस्व गाजवित आहे.

लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर वायुसेनेने या क्षेत्रात चीनच्या हवाई दलाला शिरकाव करण्याची संधी मिळणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली होती. सदर हवाई क्षेत्रात वर्चस्व गाजवित राहण्याचा निर्णय हा वायुसेनेच्या या सावधगिरीचा भाग ठरतो. अशा परिस्थितीत वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे दलाई लामा यांना लेहमधून लडाखमध्ये नेण्यात आले ही बाब चीनला चांगलीच खटकलेली असू शकते. पेलोसी यांच्या तैवानभेटीनंतर चीनचे सारे लक्ष तैवानवर केंद्रीत झाले आहे. याचा लाभ घेऊन भारताने दलाई लामा यांची लडाख भेट आयोजित करून चीनला आणखी एक धक्का दिल्याचा दावा केला जातो. सध्या परिस्थितीत चीन यावर जहाल प्रतिक्रिया देऊन नवी आघाडी उघडण्याच्या स्थितीत नाही, ही बाब लक्षात घेऊन भारताने ही खेळी केल्याचे दावे करण्यात येत आहेत.

leave a reply