चीनला सीमावाद जिवंत ठेवायचा आहे

- लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

नवी दिल्ली – चीनला भारताबरोबरील सीमावाद सोडविण्यात स्वारस्य नाही. उलट या देशाला सीमावाद जिवंत ठेवायचा आहे, असे नवे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी बजावले आहे. त्याचवेळी एलएसीवर 2020 एप्रिल महिन्याआधीची स्थिती कायम रहावी, अशी भारताची मागणी आहे, याची आठवण लष्करप्रमुखांनी करून दिली. यासाठी भारतीय लष्कराने मोक्याच्या जागी तैनाती केलेली आहे, असे सांगून जनरल पांडे यांनी चीनला विश्वासघात करण्याची संधी दिली जाणार नाही, असा संदेश दिला.

सीमावादलडाखच्या एलएसीवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करामध्ये चर्चेच्या 15 फेऱ्या पार पडल्या. मात्र एक मर्यादेच्या पलिकडे या चर्चेला यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत लष्करप्रमुख जनरल पांडे यांनी चीनला भारताबरोबरील सीमावाद सोडविण्यात स्वारस्य नाही, उलट चीनला सीमावाद जिवंत ठेवायचा आहे, असे बजावले. पत्रकारांशी संवाद साधताना लष्करप्रमुखांनी चीनच्या हेतूवर उघडपणे शंका व्यक्त केली. अशा परिस्थितीत साऱ्या देशाने सीमावादाबाबत एकजूट दाखविण्याची गरज आहे. तर लष्करी पातळीवर चीनला एलएसीवरील यथास्थिती बदलण्याचा संधी मिळणार नाही, याची दक्षता घेणे अनिवार्य ठरते, असे जनरल पांडे पुढे म्हणाले.

एलएसीवर शांतता व सौहार्द कायम राखायलाच हवे. पण हा एकतर्फी कारभार असू शकत नाही, असे लष्करप्रमुखांनी पत्रकारांना सांगितले. भारतीय लष्कराने एलएसीवर मोक्याच्या जागी तैनाती केलेली आहे. ‘कुठलीही परिस्थिती उद्भवली तर दृढनिश्चियाने त्याला तोंड द्या आणि यथास्थिती बदलण्याचा डाव हाणून पाडा, असे आदेश सैनिकांना देण्यात आले आहेत’, अशी माहिती लष्करप्रमुखांनी यावेळी दिली. दरम्यान, लडाखच्या एलएसीवरील वाद बाजूला सारून भारताने चीनशी सहकार्य करीत रहावे, अशी मागणी चीन सातत्याने करीत आहे. पण एलएसीवरून चीनच्या लष्कराने भारताच्या मागणीनुसार पूर्ण माघारघेतल्याखेरीज सहकार्य शक्य नाही, याची जाणीव भारताचे सरकार करून देत आहे.

इतकेच नाही तर चीनने आपली हटवादी भूमिका कायम ठेवली तर सध्या सुरू असलेले आर्थिक व इतर पातळ्यांवरील सहकार्य देखील निकालात निघेल, हे भारत चीनच्या लक्षात आणून देत आहे. सीमावाद धगधगता ठेवून सहकार्याच्या भुलथापांवर भारत विश्वास ठेवणार नाही, असा संदेश चीनला मिळाला आहे. तरीही चीनने अद्याप भारतावर लष्करी दबाव टाकण्याचे धोरण सोडून दिलेले नाही. यासाठी सीमावाद कायम ठेवणे हा चीनच्या भारतविषयक धोरणाचा भाग आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी देशाला चीनच्या या कावेबाजीची जाणीव करून दिली आहे.

leave a reply