भारत व फाईव्ह आईज् च्या सहकार्यापासून चीनने सावध रहावे

- चीनच्या विश्‍लेषकाचा इशारा

सावधबीजिंग – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेनंतर चीनचे अभ्यासक वेगळीच चिंता व्यक्त करू लागले आहेत. क्वाडचे सहकार्य भक्कम करण्यासाठी भारताने जपान व ऑस्ट्रेलियाबरोबरील आपले संबंध जाणीवपूर्वक विकसित केले आहेत. या दोन्ही देशांबरोबर भारताने सुरू केलेली टू प्लस टू चर्चा हे सिद्ध करते. मात्र काही झाले तरी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या ‘फाईव्ह आईज्’ संघटनेतील भारताच्या सहभागाबाबत चीनने अतिशय सावध रहावे, असा सल्ला एका चिनी अभ्यासकाने आपल्या सरकारला दिला आहे.

चीनच्या फुदान विद्यापीठातील ‘इन्स्टीट्युट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज्’चे अभ्यासक लिन मिनवँग यांनी चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात ही चिंता व्यक्त केली. भारत व ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टू प्लस टू चर्चेचा दाखला देऊन मिनवँग यांनी हे सारे क्वाडचे सहकार्य भक्कम करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आहेत, असा दावा केला. आधीच्या काळात सोव्हिएत रशियाचा मित्रदेश असलेला भारत आणि अमेरिकेचे सहकारी देश असलेले जपान व ऑस्ट्रेलिया परस्परविरोधी गटात होते. पण शीतयुद्धानंतर भारताने जपान व ऑस्ट्रेलियाबरोबरील संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली. त्याचवेळी भारताने अमेरिका व चीन यांच्यातील स्पर्धेचा लाभ घेऊन आपली प्रगती साधण्याचा शक्य तितका प्रयत्न केला. मात्र आता भारताच्या धोरणातील समतोल कायम राहिलेला नाही. भारत चीनच्या विरोधात अमेरिकेच्या बाजूने उभा राहिला आहे. भारताचा क्वाडमधील सहभाग हेच दाखवून देत आहे, असे लिन मिनवँग यांनी या लेखात म्हटले आहे.

भारत चीनविरोधी आघाडीत सहभागी होत असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपला प्रभाव वाढवित आहे. हिंदी महासागर क्षेत्रात भारताने सागरी सुरक्षेसाठी प्रगत रडारयंत्रणा तैनात केली असून या क्षेत्रातून वाहतूक करणार्‍या प्रत्येक जहाजाची माहिती भारताच्या गुरूग्राम येथील ‘इन्फॉर्मेशन सेंटर’मध्ये नोंद केली जाते. भारताच्या या यंत्रणेला ‘फाईव्ह आईज्’ गटाच्या लष्करी सहकार्याची साथ मिळत आहे.

गोपनीय माहितीचे प्रभावीरित्या आदानप्रदान करणार्‍या देशांचा गट अशी फाईव्ह आईज्ची ओळख आहे. अजूनही भारत ‘फाईव्ह आईज्’चा सदस्य बनलेला नाही. तरीही वेगवेगळ्या स्तरांवर भारताला या संघटनेकडून ही गोपनीय पातळीवरील माहिती मिळत आहे. हे लक्षात घेऊन चीनने भारत व फाईव्ह आईज्मधील या सहकार्याची गंभीर दखल घ्यावी व त्यापासून सावध रहावे, असा इशारा लिन मिनवँग यांनी दिला. तसेच भारत ‘फाईव्ह आईज्’चा सदस्य बनणार नाही, याची खबरदारी चीनने घ्यावी, असा सल्लाही मिनवँग यांनी चीनच्या सरकारला दिला आहे. मात्र भारताचा या संघटनेतील सहभाग रोखण्यासाठी चीनला काय करता येईल? याचे तपशील मिनवँग यांनी दिलेले नाहीत.

leave a reply