एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’विरोधात चीन तब्बल13 हजार उपग्रहांचे नेटवर्क उभारणार

बीजिंग – एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ कंपनीकडून उभारण्यात आलेल्या ‘स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट नेटवर्क’विरोधात चीनने दंड थोपटले आहेत. गेल्या वर्षी चिनी लष्कराने आपल्या संशोधकांना ‘स्टारलिंक’विरोधात शस्त्र विकसित करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता चीनच्या सत्ताधारी राजवटीने ‘स्टारलिंक’चा प्रभाव संपविण्यासाठी अंतराळात तब्बल 13 हजार उपग्रहांचे नेटवर्क उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’शी संबंधित संशोधक व कंपनीकडून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ कंपनीने जवळपास तीन हजार छोटे उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. पृथ्वीच्या कक्षेत (लो ऑर्बिट) भ्रमण करणाऱ्या या उपग्रहांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात जलद इंटरनेट सेवा पुरविण्याची क्षमता आहे. ‘स्टारलिंक’ अंतर्गत पृथ्वीच्या कक्षेत जवळपास 40 हजार छोटे उपग्रह सोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना मस्क यांनी आखली आहे. यासाठी मुदत निश्चित नसली तरी त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे मस्क यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. रशियाच्या या लष्करी मोहिमेदरम्यान रशियन संरक्षणदलांनी युक्रेनमधील सॅटेलाईट कम्युनिकेशन व इंटरनेट पुरविणारी यंत्रणा उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे युक्रेनी लष्कराकडे स्वतंत्र सॅटेलाईट संपर्कयंत्रणा उपलब्ध नव्हती. अमेरिकेच्या संरक्षणविभागाने मस्क यांना निर्देश देऊन त्यांच्या ‘स्टारलिंक नेटवर्क’ची सेवा युक्रेनी लष्कराला पुरविण्यास सांगितले होते. त्यासाठी मस्क यांनी आतापर्यंत जवळपास दहा कोटी डॉलर्सहून अधिक निधी खर्च केला आहे.

स्टारलिंकने युक्रेन युद्धात सिद्ध केलेली क्षमता व अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी असलेले सहकार्य यामुळे चीन धास्तावला आहे. स्टारलिंकमुळे आपल्या अंतराळातील वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता चिनी संशोधक व लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आता चीननेच स्टारलिंकला टक्कर देण्यासाठी 13 हजार उपग्रह अंतराळात सोडण्याची योजना आखली आहे. चीनमधील ‘स्पेस इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी’तील संशोधनक शु कॅन व ‘चायना सॅटेलाईट नेटवर्क ग्रुप कंपनी’ यांच्याकडून योजनेची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती हाँगकाँगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने दिली.

काही महिन्यांपूर्वी रशियानेह जॅमिंग व सायबरहल्ल्यांच्या माध्यमातून ‘स्टारलिंक’ची सेवा बंद पाडण्याचे प्रयत्न केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

leave a reply