‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल केल्यानंतरही चीनला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

coronaजीनिव्हा/बीजिंग – ‘ज्या देशात अतिशय कठोर निर्बंध लादलेले असतात अशा देशाला त्यातून बाहेर पडण्यासाठी कठीण परिस्थितीला तोंड द्यावेच लागते. पुढील काळात चीनलाही अतिशय अवघड व कठीण स्थितीला सामोरे जावे लागेल’, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला. चीनने या महिन्याच्या सुरुवातीला ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गेल्या दहा दिवसांमध्ये चीनच्या बहुतांश भागात त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून ‘मास टेस्टिंग’ व ‘क्वारंटाईन’संदर्भातील बहुतांश नियम शिथिल करण्यात आले आहेत. नियम शिथिल होत असले तरी चीनच्या जनतेतील नाराजी पूर्णपणे गेली नसून काही भागांमध्ये निदर्शने करण्यात येत असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

china protests‘झीरो कोविड पॉलिसी’च्या कडक अंमलबजावणीदरम्यान घडलेल्या दुर्घटनांमुळे भडकलेली चिनी जनता गेल्या महिन्यात रस्त्यावर उतरली होती. सलग एक आठवड्याहून अधिक काळ चीनच्या प्रमुख शहरांमध्ये निदर्शने सुरू होती. यात राजधानी बीजिंगसह शांघाय, चेंगडू, नानजिंग, झेंगझोऊ व ग्वांगझोऊ यासारख्या आघाडीच्या शहरांचा समावेश होता. ऑनलाईन सेन्सॉरशिप व सुरक्षादलांच्या माध्यमातून उगारलेला कारवाईचा बडगाही चिनी जनतेला रोखू शकला नाही. त्यामुळे चीनच्या सत्ताधारी राजवटीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. चीनच्या आजीमाजी अधिकाऱ्यांनीही नवे आंदोलन व निदर्शने अभूतपूर्व घटना असल्याची प्रतिक्रिया नोंदविली होती.

चिनी जनतेतील या अनपेक्षित उद्रेकामुळे सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने ‘झीरो कोविड पॉलिसी’ टप्प्याटप्प्याने मागे घेण्याचे जाहीर केले होते. या निर्णयाची अंमलबजावणीही तात्काळ सुरू करण्यात आली होती. मात्र निर्बंध शिथिल होत असतानाच चीनच्या राजधानीसह काही शहरांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याचे समोर येत आहे. राजधानी बीजिंगसह प्रमुख शहरांमधील हॉस्पिटल्स तसेच क्लिनिक्समध्ये रुग्णांची गर्दी वाढत चालल्याचे दावे करण्यात आले आहेत. बीजिंगच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाचे 50हून अधिक गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. शांघायसह काही शहरांमध्ये ताप तसेच कोरोनाच्या औषधांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

Zero Covid Policyचीनकडून जाहीर करण्यात येणारी रुग्णसंख्या कमी असली तरी ‘मास टेस्टिंग’ बंद झाल्याच्या घटनेकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. पुढच्या महिन्यात चीनमध्ये ‘ल्युनार इयर’चा मोठा उत्सव असतो. यामुळे चीनच्या शहरांसह इतर भागातील वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढते. ही गर्दी कोरोनाच्या नव्या लाटेला निमंत्रण देणारी ठरेल, अशी भीती चीनमधील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ‘डब्ल्यूएचओ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला इशाराही त्याला दुजोरा देणारा ठरतो. काही दिवसांपूर्वी चिनी संशोधक तसेच ब्रिटीश अभ्यासगाटने याबाबत इशाराही दिला होता.

चीनच्या ग्वांगशी प्रांतात ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल’चे प्रमुख असणाऱ्या झोऊ जिआतोंग यांचा, ‘शांघाय जर्नल ऑफ प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन’मध्ये लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात त्यांनी चीनमध्ये कोरोनाविरोधातील निर्बंध शिथिल केल्यास 20 लाख जणांचा बळी जाऊ शकतो, असा इशारा दिला. त्याचवेळी चीनमधील कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या तब्बल 23 कोटींपर्यंत जाईल, असेही जिआतोंग यांनी बजावले होते. लसीकरणाचा मंद वेग व ‘हर्ड इम्युनिटी’चा अभाव हे घटक त्यासाठी कारणीभूत ठरतील, याची जाणीवही चिनी संशोधकांनी करून दिली.

हिंदी

leave a reply