तैवानविरोधी कारवायांची चीनला जबर किंमत मोजावी लागेल

- अमेरिकी सिनेटरचा इशारा

चीनला जबर किंमतवॉशिंग्टन/तैपेई/बीजिंग – चीनकडून तैवानी जनता व तैवानी अर्थव्यवस्थेला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे व त्याची जबर किंमत चीनला मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी दिला. अमेरिकी संसद सदस्यांचे शिष्टमंडळ सध्या तैवान दौर्‍यावर आहे. यावेळी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान ग्रॅहम यांनी हा इशारा दिला. अमेरिकी शिष्टमंडळाचा भाग असणारे सिनेटर रॉबर्ट पोर्टमन यांनी अमेरिका व तैवानमध्ये मुक्त व्यापार कराराची मागणीही पुढे केली आहे.

युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्याचे संकेत दिले आहेत. यात आर्थिक, व्यापारी, राजनैतिक तसेच संरक्षणविषयक सहकार्याचा समावेश आहे. अमेरिकेच्या दोन शिष्टमंडळांनी तैवानचा दौरा केला असून आर्थिक तसेच लष्करी सहकार्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी अमेरिकेच्या संसद सदस्यांचे शिष्टमंडळ तैवानमध्ये दाखल झाले आहे. या शिष्टमंडळाने तैवानच्या राष्ट्राध्यक्षांसह संरक्षणमंत्री व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली.

चीनला जबर किंमत

अमेरिकेचे शिष्टमंडळ तैवानी राष्ट्राध्यक्षांची भेट घेत असतानाच चीनने तैवाननजिकच्या क्षेत्रात लष्करी सराव केल्याचे समोर आले आहे. या सरावासाठी चीनच्या ‘ईस्टर्न थिएटर कमांड’ने ईस्ट चायना सीमध्ये विनाशिका, बॉम्बर्स तसेच लढाऊ विमाने धाडली होती. अमेरिकेकडून तैवान मुद्यावर देण्यात येणार्‍या चुकीच्या संदेशांना प्रत्युत्तर देण्यासाठी सराव आयोजित केल्याचा इशारा चीनने दिला आहे.

तैवानी राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेत अमेरिकी शिष्टमंडळाने, चीनविरोधात सर्व पर्याय अमेरिकेसमोर खुले असल्याचे संकेत दिले. आम्हांला संघर्ष नको आहे, पण आमच्या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही लढाईत उतरू शकतो असे अमेरिकेने बजावले. ही बाब लक्षात घेऊन चीनने योग्य पर्याय निवडावा, असा इशाराही अमेरिकेकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, तैवान अमेरिकेबरोबरील संरक्षणसहकार्य वाढवित असला तरी अमेरिका तैवानच्या मागण्यांची योग्य वेळेत पूर्तता करीत नसल्याचा दावा ‘डिफेन्स न्यूज’ या वेबसाईटने केला आहे.

leave a reply