चीन तीन दशकांनंतर भारतातून तांदूळ आयात करणार

मुंबई – लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकलेले असताना चीन भारताकडून तांदूळ आयात करत आहे. तांदळाचा सर्वात मोठा आयातदार देश असलेल्या चीनने गेल्या तीन दशकात भारताकडून तांदूळ आयात केला नव्हता. तांदळाच्या गुणवत्तेवर बोट ठेवत, भारताकडून तांदूळ आयात करणे चीनने नेहमी टाळले होते. या पार्श्‍वभूमवीर चीन भारताकडून तांदूळ आयात करणार असल्याची बातमी लक्षवेधी ठरत आहे.

भारतातून तांदूळ

चीन भारताकडून सुमारे एक लाख टन तुकडा तांदूळ आयात करीत आहे. सुमारे 300 डॉलर्स प्रति टन या दराने हा तांदूळ भारतातून चीनला डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत निर्यात केला जाईल, अशी माहिती तांदूळ निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष बी.व्ही.कृष्णाराव यांनी दिली. चीनला तांदळाचा पुरवठा करणाऱ्या पाकिस्तान, थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनाम देशांमध्ये यावर्षी तांदळाचे उत्पादन कमी झाले आहे. देशांतर्गत गरज भागवून निर्यात करण्यासाठी या देशांकडे तांदळाचा अतिरिक्त साठा फार कमी राहिला आहे. यामुळे चीनने आता भारताकडून तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनला तांदूळ निर्यात करण्यासाठी भारताने सवलतीच्या दराचा प्रस्ताव चीनसमोर ठेवला होता. या प्रस्तावानुसार इतर देशातून आयात करण्यात येणाऱ्या तांदूळाच्या दरापेक्षा भारताचा तांदूळ चीनला 30 डॉलर्स प्रति टन इतका स्वस्त पडत आहे. यामुळे चीन भारतातून तांदूळ आयात करण्यासाठी तयार झाल्याचे सांगण्यात येते.

भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. तर चीन तांदळाचा मोठा आयातदार देश आहे. चीन दरवर्षी 40 लाख टन तांदूळाची आयात करतो. मात्र चीनने भारतातून तांदूळ आयात करणे नेहमी टाळले आहे. भारतीय तांदळाच्या गुणवत्तेवर बोट ठेवून भारतातून तांदूळ आयात करणे टाळणारा चीन पाकिस्तानातून मात्र मोठ्या प्रमाणावर तांदूळ आयात करतो. त्यामुळे भारतातून तांदूळ आयात करण्याचा चीनचा निर्णय लक्षवेधी ठरतो.

चीन तांदळचा सर्वात मोठाउत्पादक देश असला, तरी संपूर्ण देशाची गरज भागेल इतके तांदळाचे उत्पादन चीनमध्ये होत नाही. त्यामध्ये चीनमध्ये यावर्षी अन्न संकट आल्याचे दावे केले जात आहेत. कोरोनाव्हायरसचे संकटाचा आणि नैसर्गिक आपत्तीचा फटका चीनला बनसल्याने चीनला अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे. यादृष्टीनेही चीन भारतातून करीत असलेल्या तांदूळ आयातीकडे पाहिले जात आहे.

भारत आणि चीनमध्ये व्यापारात भारताला मोठ्या प्रमाणावर व्यापारी तूट सहन करावी लागत आहे. भारताने याबाबत बजावून देखील चीनने याकडे दूर्लक्ष केले होते. नियमांचे अडथळे घालून आणि गुणवत्ता व इतर कारणे पुढे करून भारतातून होणारी आयात कमी राहिल याची दक्षता चीनने घेतली होती. मात्र गेल्या काही वर्षात भारताने चीनमधून होणारी आयात कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या संकटाचा संधी म्हणून लाभ घेत आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन वाढविले. गलवानमधील संघर्षानंतर भारतात चीनविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून भारतीय ग्राहकांनी चिनी मालाकडे पाठ फिरविली आहे. यामुळेही चीन अस्वस्थ झाला असून दोन्ही देश एकमेकांच्या साथीने प्रगती करू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. या पार्श्‍वभूमीवरही चीनचा भारतातून तांदूळ आयातीचा निर्णय महत्वाचा ठरतो.

leave a reply