चीनला रोजगार पुरवून भारतीय बाजारपेठेचा लाभ घेता येणार नाही

- बहुराष्ट्रीय कंपन्यांना केंद्र सरकारचा संदेश

नवी दिल्ली – चीनमध्ये मोटारी तयार करून त्याची विक्री भारतात करायची, ही योजना काही पचनी पडणारी नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टेसला मोटर्स कंपनीला बजावले आहे. इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती करणार्‍या या कंपनीने भारताने सीमा शुल्क कमी करावा, अशी मागणी केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनीही केंद्र सरकारची भूमिका परखडपणे मांडली. भारताच्या बाजारपेठेचा लाभ घ्यायचा आणि रोजगार मात्र चीनला द्यायचा, हे खपवून घेतले जाणार नाही, असे गुर्जर यांनी म्हटले आहे.

चीनला रोजगार पुरवून भारतीय बाजारपेठेचा लाभ घेता येणार नाही - बहुराष्ट्रीय कंपन्यांना केंद्र सरकारचा संदेश‘टेसला मोटर्ससाठी भारताचे दरवाजे खुले आहेत. भारतात आपला प्रकल्प टाकून ते इथेच मोटारींची निर्मिती करून भारतीयांना रोजगार देऊ शकतात. याने सरकारचा महसूलही वाढेल. पण टेसला मोटर्सने त्याची तयारी दाखविलेली नाही. त्यामुळे चीनला रोजगार पुरवायचा आणि मोटारी भारतात विकायच्या हे टेसला मोटर्सचे धोरण भारतचे सरकार खपवून घेणार नाही. भारतीय बाजारपेठेचा लाभ घ्यायचा असेल, तर रोजगारही भारतालाच मिळायला हवा, ही केंद्र सरकारची भूमिका आहे’, असे गुर्जर यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने ‘प्रॉडक्शन लिंक इन्सेटिव्ह’ ही उत्पादनाला चालना देणारी योजना राबविली असून त्याला लाभ देशी व परदेशी कंपन्यांना देखील घेता येऊ शकतो. टेसला मोटर्सही याचा फायदा घेऊन भारतात आपला कारखाना टाकू शकेल, असे गुर्जर यांनी सुचविले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील यासंदर्भात माध्यमांशी बोलताना केंद्र सरकरची भूमिका स्पष्टपणे मांडली. टेसला मोटर्सने भारतात नवा प्रकल्प सुरू करावा, यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा केली होती, अशी माहिती गडकरी यांनी दिली. चीनमध्ये मोटारी बनवून त्यांची भारतात विक्री करण्याची कल्पना पटणारी नाही, याचीही जाणीव आपण या कंपनीला करून दिल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. तरीही या कंपनीला चीनमध्येच मोटारी तयार करून त्या भारतात विकायच्या असतील, तर त्याला आमची हरकत नाही. पण तशा स्थितीत इतर मोटार कंपन्यांप्रमाणे टेसला मोटर्सला देखील सीमा शुल्क भरावेच लागेल. त्यात सवलत मिळणार नाही, असे गडकरी यांनी खडावले आहे.

कोरोनाची साथ, वीजेची टंचाई व कम्युनिस्ट राजवटीने स्वीकारलेल्या धोरणांविरोधात जगभरातून येणार्‍या प्रतिक्रिया, या सार्‍यांमुळे चीनमध्ये उत्पादन करणे अवघड बनले आहे. म्हणूनच जगाची फॅक्टरी मानल्या जाणार्‍या चीनमधून आता बहुराष्ट्रीय कंपन्या बाहेर पडू लागल्या आहेत. या कंपन्यांना आपल्या देशाकडे वळविण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. फार मोठी बाजारपेठ, लोकशाही व्यवस्था आणि कुशल मनुष्यबळ असलेल्या भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या उत्सुकता दाखवित आहेत. केंद्र सरकरने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवून तसेच ‘प्रॉडक्शन लिंक इन्सेटिव्ह’सारखे प्रोत्साहनपर उपक्रम हाती घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात येण्याचे आवाहन केले आहे.

भारताच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून काही बहुष्ट्रीय कंपन्या भारतात मोठी गुंतवणूक करीत आहेत. तर काही कंपन्यांना यासंदर्भात भारताशी वाटाघाटी करीत आहेत. म्हणूनच केंद्र सरकारने देशात कारखाने सुरू करण्यासाठी गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेचा अधिक उत्तमरित्या लाभ घेता येईल, असा स्पष्ट संदेश दिला आहे. टेसला मोटर्सला देखील भारत सरकार याची जाणीव करून देत असल्याचे दिसते.

leave a reply