चीन इंधनव्यापारासाठी युआनचा वापर करण्यावर भर देईल

- ‘गल्फ समिट’मध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा दावा

युआनचा वापररियाध/बीजिंग – ‘चीन यापुढेही आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवेल. नैसर्गिक इंधनवायूचा व्यापारही वाढविण्यात येईल. या इंधनव्यवहारांसाठी चीनकडून शांघाय पेट्रोलियम ॲण्ड नॅशनल गॅस एक्सेंजचा व्यासपीठ म्हणून वापर होईल. या माध्यमातून होणारे कच्चे तेल व इंधनवायूचे व्यवहार युआनमध्ये पार पडतील’, या शब्दात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुढील काळात अरब देशांबरोबरील इंधनव्यवहार युआन चलनात करण्याचे संकेत दिले.

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग बुधवारपासून सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात चीन व सौदी अरेबियादरम्यान अब्जावधी डॉलर्सचे करार पार पडले असून त्यात इंधनविषयक करारांचाही समावेश आहे. चीन हा जगातील आघाडीचा इंधन आयातदार देश असून सर्वाधिक इंधन आखाती देशांकडून आयात करण्यात येते. हा व्यापार अधिकाधिक वाढविण्यावर चीनचा भर आहे. गेल्या वर्षभरात अमेरिका व आखातातील प्रमुख अरब देशांमधील संबंध अधिकाधिक तणावपूर्ण होत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर चीन व रशिया हे दोन्ही देश अरब देशांबरोबरील सहकार्य अधिकाधिक वाढविण्याचा प्रयत्न करीत असून जिनपिंग यांचा सौदी दौरा त्याचाच भाग ठरतो.

युआनचा वापरसौदी अरेबियानेही अमेरिकेबरोबरील तणाव वाढल्यानंतर रशिया, चीन, भारत यासारख्या देशांबरोबरील संबंध दृढ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग सौदीच्या दौऱ्यावर असताना सौदी राजवटीने पुढाकार घेऊन अरब देशांच्या दोन स्वतंत्र बैठकांचे आयोजन केले. यात ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’ व ‘अरब लीग’ अशा दोन गटांचा समावेश होता. यातील ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’च्या बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी इंधनव्यापार वाढविण्याबरोबरच त्यात युआनचा वापर करण्याचे संकेत दिले.

चीन व आखाती देशांबरोबरील इंधनव्यवहारांमध्ये युआनचा वापर सुरू झाल्यास ही बाब अमेरिकी डॉलरच्या वर्चस्वासाठी सर्वात मोठा धक्का ठरेल. गेल्या शतकात अमेरिकी डॉलरला आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीचे राखीव चलन म्हणून मान्यता मिळवून देण्यात इंधनव्यवहारांचा प्रमुख वाटा होता. इंधन उत्पादक देशांनी डॉलरमध्ये व्यवहार मान्य केल्याने त्याचा वापर वाढून सर्वमान्य चलन म्हणून प्रस्थापित झाला होता. गेली काही वर्षे चीनही युआनला आंतरराष्ट्रीय स्तरावरील चलन म्हणून मान्यता मिळविण्यासाठी धडपडत असून जगातील अनेक देशांबरोबर यासंदर्भातील करारही केले आहेत. अनेक देशांबरोबरील द्विपक्षीय व्यापारात चीनने युआनच्या वापराची अट घालून त्याचा वापर व जागतिक व्यवहारांमधील हिस्सा वाढविण्यात यश मिळविले आहे.

आखाती देशांनी युआनचा वापर सुरू केल्यास जागतिक पातळीवर त्याला मान्यता मिळून त्याचा वापर प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे जिनपिंग यांनी उघडपणे आखाती देशांच्या बैठकीत त्याचे संकेत दिले आहेत. या वक्तव्यामागे अमेरिका-चीन स्पर्धा आणि अमेरिका व आखाती देशांमधील वाढते मतभेद हे दोन घटकांचीही पार्श्वभूमी असल्याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधनव्यवहारात ‘पेट्रोयुआन’चा वापर ही बाब जागतिक स्तरावरील अमेरिकेचे महासत्तापदही धोक्यात आणू शकते, असे विश्लेषकांनी बजावले आहे.

हिंदी

leave a reply