देशाच्या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचे काम सुरू झाले

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

विमानवाहूनवी दिल्ली – स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी देशात सुई देखील तयार होत नव्हती. पण 75 वर्षानंतर भारत स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौकेची निर्मिती करीत आहे. अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा जगातला सातव्या क्रमांकाचा देश बनला आहे. आयएनएस विक्रांतच्या नौदलातील सहभागानंतर देशाने आणखी एका विमानवाहू युद्धनौकेच्या निर्मितीवर काम सुरू केले आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी जाहीर केले. तर नौदलप्रमुख आर. हरि कुमार यांनी पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या ध्येयासाठी नौदल फार मोठे योगदान देण्यास तयार असल्याचे जाहीर केले.

एका खाजगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व नौदलप्रमुख आर. हरि कुमार बोलत होते. काही महिन्यांपूर्वी नौदलात सहभागी झालेल्या विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’चा दाखला देऊन संरक्षणमंत्र्यांनी या आघाडीवर देशाला मिळालेल्या यशावर समाधान व्यक्त केले. काही वर्षांपूर्वी भारत स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका विकसित करील, असा विचारही कुणी केला नसेल. पण आज अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व चीन यांच्यानंतर विमानवाहू युद्धनौकेची उभारणी करण्याची क्षमता असलेला भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा देश बनला आहे, असे राजनाथ सिंग पुढे म्हणाले.

आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विक्रांत यांच्यानंतर देशाने तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेवर काम सुरू केले आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा संरक्षणमंत्र्यांनी यावेळी केली. मात्र याचे तपशील त्यांनी उघड केले नाहीत. काही दिवसांपूर्वी देशाला तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता असल्याचे नौदलप्रमुख म्हणाले होते. मात्र ही विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतप्रमाणे 45 हजार टन वजनाची असेल की 65 हजार टन वजनाची महाकाय युद्धनौका असेल, यावर अजूनही निर्णय झालेला नसल्याचे नौदलप्रमुखांनी म्हटले होते. मात्र 45 हजार टनाच्या विमानवाहू युद्धनौकेवर नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे एकमत झाल्याचे दावे प्रसिद्ध झाले आहेत. ‘विक्रांत’ची निर्मिती करणाऱ्या विशाखापट्टणम्‌‍ शिपयार्डने देखील 45 हजार टन वजनाच्या युद्धनौकेची निर्मिती पाच ते सहा वर्षात होऊ शकेल, असा प्रस्ताव नौदलाला दिला होता.

दरम्यान, संरक्षणदलांनी देशी बनावटीची शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा वापर सुरू केला तर भारत अल्पावधित पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, असे आपल्याला पंतप्रधानांनी सांगितले होते, अशी माहिती नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी दिली. भारतीय नौदल देशाच्या या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी सर्वतोपरी योगदान देईल, असे नौदलप्रमुखांनी या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात स्पष्ट केले. इतकेच नाही मौर्य, गुप्त आणि चोळ साम्राज्याच्या काळात देशाचा विकास सागरी मार्गाने झालेल्या व्यापार आणि नौदलशक्तीमुळे झाला होता, याची आठवण नौदलप्रमुखांनी यावेळी करून दिली.

भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, याचा अर्थ सागरी मालवाहतूक वाढेल असा होतो. सागरी मार्गाने प्रचंड मालवाहतूक माफक दरात करता येते. त्यामुळे सागरी वाहतुकीचे महत्त्व पुढच्या काळात अधिकच वाढेल व या व्यापारी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी नौदल फार मोठे योगदान देईल, असेही ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री व नौदलप्रमुखांनी केलेल्या या विधानांना पार्श्वभूमी लाभललेली आहे. हेरगिरी करणारी चीनची जहाजे भारतीय सागरी हद्दीजवळ वावरत आहेत. भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या नोंदी घेण्यासाठी चीनने ही जहाजे इथे धाडल्याचा दावा केला जातो. त्यावर नौदलाची करडी नजर असल्याचे नौदलप्रमुखांनी नुकतेच बजावले होते. त्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी देशाच्या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेवर काम सुरू झाल्याचे जाहीर करून चीनला इशारा दिल्याचे दिसत आहे. याआधी संरक्षणमंत्र्यांनी भारत हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संपूर्ण सुरक्षा पुरविणारा देश असल्याची घोषणा केली होती.

हिंदी

leave a reply