चीनच्या विमानवाहू युद्धनौकेचा जपानच्या ‘नान्सी’ बेटाला लक्ष्य करणारा सराव

China-Liaoning-Carrierबीजिंग – जपानने आपल्या संरक्षण धोरणात केलेल्या आक्रमक बदलामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने युद्धसरावाचे आयोजन करून थेट जपानला इशारा दिला. चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने ‘वेस्टर्न पॅसिफिक’ क्षेत्रातील जपानच्या ‘नान्सी’ बेटाला लक्ष्य करणारा सराव सुरू केला आहे. जपानने चीनला लष्करी आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर या क्षेत्रातील जपानच्या बेटांवर हल्ले चढविले जातील, अशी धमकीच चीनने या सरावाद्वारे दिल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यात जपानच्या पंतप्रधानांनी संरक्षण धोरणात तीन महत्त्वाचे व आक्रमक बदल केले. यानुसार जपानच्या संरक्षणखर्चात भलीमोठी वाढ करण्यात आली. तर थेट चीनपर्यंत मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी जपानने स्वतंत्र तरतूद केली आहे. त्याचबरोबर या संरक्षण धोरणात जपानने तैवानचा देखील उल्लेख केला. जपानच्या संरक्षण धोरणातील या मोठ्या बदलामुळे चीन भलताच खवळल्याचा दावा जपानी माध्यमे करीत आहेत.

Japan-Ryukyu-Islands-China-Mapचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पिपल्स लिबरेशन आर्मीला जपानच्या नान्सी बेटाजवळ सराव सुरू करण्याचे आदेश दिले. दर वर्षाच्या अखेरीस चीनचे लष्कर व नौदल युद्धसरावाचे आयोजन करून आपल्या लष्करी सज्जतेचे प्रदर्शन करतात. पण यावेळी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी स्थळ व काळ सुचविल्याचे जपानी माध्यमे लक्षात आणून देत आहेत. यावेळी चीनच्या लिओनिंग या विमानवाहू युद्धनौकेने आपल्या विनाशिकांच्या सहाय्याने नान्सी बेटाला घेरण्याचा व त्यावर हल्ले चढविण्याचा सराव केला.

नान्सी बेटापासून दूर अंतरावर हा सराव सुरू असून सोमवारी २६ डिसेंबर रोजी दहा दिवसांचा हा सराव संपुष्टात येईल. पण या सरावाद्वारे चीनने जपानला इशारा दिल्याचा दावा केला जातो. तैवानच्या सागरी क्षेत्रापासून काही अंतरावर असलेल्या नान्सी बेटावर जपानचे प्रशासन आहे. चीनकडून तैवानच्या सुरक्षेला धोका लक्षात घेऊन जपानने याआधीच या बेटांच्या सुरक्षेसाठी तैनाती करण्याचे जाहीर केले होते.

leave a reply