चीनच्या महत्त्वाकांक्षा व आक्रमकता आंतरराष्ट्रीय समुदायासाठी आव्हान – नाटोचा इशारा

ब्रुसेल्स/बीजिंग – चीनच्या महत्त्वाकांक्षा व आक्रमक हालचाली नियमांवर आधारलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्था व नाटोच्या सुरक्षेशी निगडीत क्षेत्रांसाठी मोठे आव्हान ठरते, असा इशारा नाटोने दिला आहे. सोमवारी ब्रुसेल्समध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर नाटोने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले असून, चीनचा वाढता प्रभाव व धोरणांचा नाटोने एकजुटीने मुकाबला करायला हवा, असे आवाहनही केले आहे. नाटोच्या या वक्तव्यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, नाटोने ‘चायना थ्रेट थिअरी’बाबत अतिशयोक्तीपूर्ण विधाने करणे थांबवावे, असा टोला लगावला आहे.

चीनच्या महत्त्वाकांक्षागेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात, नाटोने ‘नाटो २०३०’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात चीनच्या धोक्याचा उल्लेख करून त्याला रोखण्यासाठी आक्रमक भूमिका आवश्यक असल्याची शिफारस करण्यात आली होती. सोमवारी नाटोच्या बैठकीत चीनच्या धोक्याबाबत विस्तृत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून बैठकीनंतर झालेल्या संयुक्त निवेदनात त्याचे स्पष्ट प्रतिबिंब पडल्याचे दिसत आहे. आपल्या सात दशकांच्या इतिहासात नाटोने प्रथमच आपल्या निवेदनात चीनच्या धोक्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

या निवेदनात चीनच्या महत्त्वाकांक्षा व आक्रमकतेकडे लक्ष वेधून ही बाब नाटो सदस्य देशांच्या सुरक्षेशी निगडित असलेल्या क्षेत्रांसाठी धोकादायक ठरत असल्याची जाणीव करून देण्यात आली आहे. नाटोचे मूळ असलेल्या ‘वॉशिंग्टन ट्रिटी’चा उल्लेख करुन चीनची बळजबरीची धोरणे या करारातील मूल्यांशी विसंगत असल्याचा उल्लेख नाटोने केला आहे. चीनकडील वाढते अण्वस्त्रसाठे, रशियाबरोबरील लष्करी सहाय्य हे आव्हान ठरत असल्याचे निवेदनात बजावण्यात आले आहे.

त्याचवेळी चीनच्या राजवटीकडून करण्यात येणारा खोट्या माहितीचा प्रसार व पारदर्शकतेचा अभाव यावरही नाटोने कोरडे ओढले आहेत. चीन एक प्रमुख सत्ता आहे, याची जाणीव त्या देशाच्या राजवटीने ठेवावी आणि अंतराळ, सायबर तसेच सागरी क्षेत्रातील नियम तसेच करारांचे जबाबदारीने पालन करावे, असा इशाराही नाटोच्या निवेदनात देण्यात आला आहे. ३० सदस्य देशांच्या ‘नाटो’कडून करण्यात आलेल्या टीकेने चीन चांगलाच अस्वस्थ झाला असून नाटोने इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे, असे सुनावले आहे.

‘नाटोने चीनच्या विकासाकडे निकोप दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. चीनचे संरक्षण धोरण बचावात्मक असून नाटोने संवाद साधण्यावर आपली अधिक ऊर्जा खर्च करावी’, असा टोला चीनने लगावला आहे. त्याचवेळी नाटो अजूनही शीतयुद्धकालिन मानसिकताच पुढे घेऊन चालल्याचा आरोपही चीनने केला आहे.

नाटोकडून चीनच्या धोक्याबाबत करण्यात येणार्‍या वक्तव्यांचा उल्लेख ‘चायना थ्रेट थिअरी’ असा करून, स्वतःच्या हितसंबंधांसाठी त्याचा वापर करणे थांबवावे, असा अनाहूत सल्लाही चीनने दिला आहे.

leave a reply