कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व प्रगत देशांनी जाहीर केलेल्या अर्थसहाय्यावर चीनचे टीकास्त्र

बीजिंग/वॉशिंग्टन – कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व इतर प्रगत देशांनी जाहीर केलेल्या अर्थसहाय्याचे विपरीत परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात, अशी टीका चीनने केली आहे. अमेरिकेकडून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी घोषित केलेल्या प्रचंड अर्थसहाय्यामुळे वित्तीय बाजारपेठेत मोठे बुडबुडे तयार झाले असून, चीनला त्याची चिंता वाटत असल्याचे मध्यवर्ती बँकेचे प्रमुख अधिकारी गुओ शुकिंग यांनी म्हटले आहे.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे. अमेरिका व युरोपसह जगातील अनेक प्रमुख देशांना आर्थिक मंदीलाही तोंड द्यावे लागले आहे. बेरोजगारीसह इतर सामाजिक समस्यांची तीव्रताही वाढली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेसह अनेक प्रगत देशांनी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त अर्थसहाय्याची घोषणा केली होती. एकट्या अमेरिकेने आतापर्यंत चार ट्रिलियन डॉलर्सचे अर्थसहाय्य जाहीर केले असून त्यात अजून दोन ट्रिलियन डॉलर्सची भर पडण्याचे संकेत आहेत. युरोपिय महासंघानेही आपल्या सदस्य देशांकरता २.२ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थसहाय्याला मंजुरी दिली आहे.अमेरिका व युरोपिय देशांच्या या अर्थसहाय्याचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्याचा दावा चीनचे वरिष्ठ अधिकारी गुओ शुकिंग यांनी केला आहे.

‘अमेरिका व युरोपिय देशांनी दिलेल्या अर्थसहाय्यामुळे या देशांमधील बाजारपेठांमध्ये अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मालमत्ता क्षेत्रासह इतर अनेक घटकांचे मूल्य प्रमाणाबाहेर वाढल्याचे दिसत आहे. खरी अर्थव्यवस्था व वित्तीय बाजारांमध्ये मोठा फरक असल्यास त्यातून अनेक समस्यांना सुरुवात होऊ शकते. नजिकच्या काळात शेअरबाजारात मोठ्या घसरणीचा धोका आहे’, असे शुकिंग यांनी बजावले.

चीनच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख अधिकारी असणार्‍या शुकिंग यांनी अमेरिकेतील शेअरबाजार हा जागतिक अर्थव्यवस्थेला असलेला सर्वात मोठा धोका असल्याचा इशाराही दिला. अमेरिकेसह इतर प्रगत देशांमधील नेतृत्त्वाने त्यांनी जाहीर केलेल्या अर्थसहाय्यामुळे उर्वरित जगावर काय परिणाम होतील, याकडे लक्ष पुरवायला हवे, असा सल्लाही चिनी अधिकार्‍यांनी दिला. या देशांकडून देण्यात आलेल्या अर्थसहाय्याचे परिणाम हळुहळू दिसून येत असल्याचा दावाही गुओ शुकिंग यांनी केला.

शुकिंग यांच्यापूर्वी चीनचे माजी अर्थमंत्री लोउ जिवेई यांनीही अमेरिकेच्या अर्थसहाय्याच्या धोरणावर टीका केली होती.

leave a reply