हौथींचा सौदीच्या इंधनप्रकल्पावर कुद्स क्षेपणास्त्राचा हल्ला

सना – येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अराम्को इंधन प्रकल्पावर ‘कुद्स’ क्षेपणास्त्राचा हल्ला चढविल्याचा दावा केला आहे. हौथींच्या या दाव्यावर सौदीने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण राजधानी रियाधसह जेद्दाह व इतर प्रमुख शहरांतील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर गेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हौथींनी सौदीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते.

हौथी किंवा अन्सर अल्ला या नावाने ओळखल्या जाणार्‍या या संघटनेचा प्रवक्ता ब्रिगेडिअर याह्या सारी याने सोशल मीडियाद्वारे सौदीच्या इंधनप्रकल्पावरील हल्ल्याची माहिती दिली. ‘रेड सी’जवळ असलेल्या सौदीच्या

जेद्दाह शहरातील अराम्कोच्या सर्वात मोठ्या इंधन प्रकल्पावर हा हल्ला चढविल्याचे सारी म्हणाला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात याच प्रकल्पावर हल्ला चढविला होता, याची आठवण हौथींच्या प्रवक्त्याने करून दिली.

जेद्दाह येथील इंधनप्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात इंधनाचा साठा केलेला आहे. त्यामुळे या इंधनप्रकल्पाला लक्ष्य करून हौथी बंडखोरांनी सौदीला चिथावणी दिल्याचा दावा आखाती माध्यमे करीत आहेत. त्याचबरोबर हौथींनी या हल्ल्यासाठी ‘कुद्स-२’ या क्षेपणास्त्राचा वापर करून आपल्या शस्त्रसज्जतेमध्ये वाढ झाल्याचा इशाराही दिला आहे. याआधी हौथींनी सौदीच्या शहरांवर हल्ले चढविण्यासाठी ‘कुद्स-१’ या क्षेपणास्त्राचा वापर केला होता.

गेल्या काही दिवसांपासून हौथींनी येमेन तसेच सौदीवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. सौदीच्या दक्षिण सीमेवरील लष्करी तळांबरोबर हौथींनी सौदीची राजधानी रियाधवरही हल्ले चढविले आहेत. या व्यतिरिक्त सौदीचे समर्थन असलेल्या येमेनच्या लष्कराच्या ताब्यातील मारिब शहराचाही हौथींनी ताबा घेतला आहे. हौथींच्या या हल्ल्यांवर सौदी आणि अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

leave a reply