बीजिंग – कोरोनाच्या साथीमुळे भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत भारत आपल्याला न परडवणारी शस्त्रास्त्रे खरेदी करून संरक्षणखर्च वाढवित चालला आहे. पण परदेशी शस्त्रास्त्रे खरेदी करून भारताच्या लष्कराचे आधुनिकीकरण होणार नाही, अशी शेरेबाजी चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने केली. भारताच्या संरक्षणखर्चावर असे शेरे मारत असताना, चीन लडाखच्या एलएसीवर अधिक प्रमाणात रणगाड्यांची तैनाती वाढवित असल्याची माहिती वृत्तवाहिन्या देत आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणावर ग्लोबल टाईम्सने केलेली टीका म्हणजे चीनच्या पोटशूळाचा भाग असल्याचे दिसते. लडाखच्या एलएसीवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनच्या लष्करी अधिकार्यांमधील चर्चेची नववी फेरी नुकतीच पार पडली. ही चर्चा देखील निष्फळ ठरली. भारताने लडाखच्या एलएसीवरून सैन्य मागे घ्यावे, अशी चीनची एकतर्फी मागणी आहे. तर इथल्या एलएसीवर एप्रिल महिन्याच्या आधीची परिस्थिती प्रस्थापित व्हावी, असे भारताचे म्हणणे आहे. मात्र चीन ते मान्य करून या क्षेत्रातून माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळे एलएसीवरील तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत चीनने लडाखच्या एलएसीजवळ मोठ्या प्रमाणात जवान व रणगाडे तैनात करून त्यांच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हा भारतावर लष्करी दडपण आणण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
या पार्श्वभूमीवर, सोमवारी सादर करण्यात आलेल्या भारताच्या अर्थसंकल्पात संरक्षणखर्चात १९ टक्क्यांची वाढ करण्यात आली. हा गेल्या पंधरा वर्षातील उच्चांक ठरतो. तसेच नवी शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य यांच्या खरेदीसाठी स्वतंत्र रक्कमेची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. तसेच लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक तो निधी पुरविला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले होते. भारताच्या अर्थसंकल्पाकडे अत्यंत बारकाईने पाहणार्या चीनकडून यावर प्रतिक्रिया उमटली आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने यावर शेरे मारले आहेत.
कोरोनाच्या साथीमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. अशा काळात या संकटातून बाहेर पडण्यासाठी अधिक आर्थिक तरतूद करण्याच्या ऐवजी भारत आपल्या संरक्षणखर्चात वाढ करीत आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिकच धोक्यात येईल, असा इशारा ग्लोबल टाईम्सने दिला आहे. इतकेच नाही तर महागड्या शस्त्रास्त्रांची खरेदी करून आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्याचे ध्येय भारताला साध्य करता येणार नाही, असा दावा ग्लोबल टाईम्सने ठोकला आहे. त्यासाठी चीनच्या या सरकारी दैनिकाने आपल्या काही विश्लेषकांच्या दाव्यांचा हवाला दिलेला आहे.
अमेरिका, इस्रायल, रशिया आणि फ्रान्स या देशांकडून भारताने कोरोनाची साथ असताना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी केली. आपले मर्यादित लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी भारताने केलेली ही धडपड पुरेशी ठरणार नाही, असे चीनच्या विश्लेषकांचे म्हणणे या बातमीत देण्यात आलेले आहे. जर भारताच्या या शस्त्रास्त्रांचे नुकसान झाले, तर त्यांची जागी दुसरी शस्त्रास्त्रे मिळविणे भारतासाठी अवघड बनेल, असे चीनचे विश्लेषक साँग झाँगपिंग यांनी बजावले आहे. चीन मात्र शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची आपल्या देशातच निर्मिती करीत असल्याने या आघाडीवर भारतावर मात करू शकतो, असा संकेत देण्याचा प्रयत्न चिनी विश्लेषक करीत आहेत.
याआधीही चीनने अशा स्वरुपाचे दावे केले होते. मात्र दर्जा, विश्वासार्हता आणि चाचणी या तिन्ही आघाड्यांवर चीनची शस्त्रास्त्रे कुचकामी ठरत असल्याची बाब याआधी वारंवार उघड झाली होती. मुख्य म्हणजे चीनने गेल्या कित्येक दशकात एकाही युद्धाचा सामना केलेला नाही. तसेच चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य यांचीही कसोटी आत्तापर्यंत लागलेली नाही, याकडे भारतीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत. लडाखच्या हिवाळ्याचा सामना करण्यासाठी चीनच्या जवानांकडे गरम कपडेही नव्हते. तसेच चीनच्या लष्कराचे जवान लडाखच्या हिवाळ्यात पुरते गारठून गेले, ही बाब देखील चिनी लष्कराची अव्यवसायिकता दाखवून देणारी बाब ठरते.
त्यामुळे ग्लोबल टाईम्ससारख्या आपल्या सरकारी मुखपत्राद्वारे भारताला हिणविण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद ठरते. प्रत्यक्षात भारतीय संरक्षणदलांची युद्धसज्जता पाहून चीन कमालीचा अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे.