कोरोनाबाबतची चीनची लपवाछपवी ‘चेर्नोबिल’ इतकीच भयंकर

- ब्रिटनच्या माजी मंत्र्यांचा ठपका

लंडन – चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतच कोरोनाच्या विषाणूची निर्मिती झाली, या आरोपाला जागतिक पातळीवर दुजोरा मिळत आहे. संशोधकांनी कोरोनाचा विषाणू नैसर्गिक नाही, यावर शिक्कामोर्तब केले आहे. तर कोरोना चीनच्या प्रयोगशाळेतूनच पसरविण्यात आला, याची खात्री ब्रिटनच्या गुप्तचर विभागाला पटलेली आहे. इतकेच नाही तर कोरोनाच्या साथीबाबत चीन करीत असलेली लपवाछपवी सोव्हिएत रशियात झालेल्या चेर्नोबिल आण्विक दुर्घटनेइतकीच भयंकर आहे व आपण सारे त्याची किंमत चुकती करीत आहोत, असा ठपका ब्रिटनचे माजी मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी ठेवला.

कोरोनाबाबतची चीनची लपवाछपवी ‘चेर्नोबिल’ इतकीच भयंकर - ब्रिटनच्या माजी मंत्र्यांचा ठपकाकोरोनाची साथ पसरविण्याचे आरोप होऊ लागल्यानंतर अस्वस्थ झालेल्या चीनने भारतातून आलेल्या कोरोनाच्या विषाणूची लागण आपल्या नागरिकांना झाल्याचे दावे ठोकले. चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने हा आरोप केला आहे. सध्या चीनमध्ये सापडत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये इंडियन स्ट्रेन असल्याचा दावा या चिनी मुखपत्राने केला. पण प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय पातळीवरून होत असलेल्या आरोपातून आपली सुटका करून घेण्यासाठी चीन आता भारताकडे बोट दाखवित असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

कोरोना नैसर्गिकदृष्ट्या जन्मलेला विषाणू नाही. तर त्याची निर्मिती प्रयोगशाळेत करण्यात आलेली आहे. मात्र हा विषाणू नैसर्गिक वाटेल, अशारितीने त्याची रचना करण्यात आलेली आहे, अशी माहिती देणारा अभ्यासपूर्ण लेख ब्रिटनचे संशोधक प्रोफेसर अँगस डॅलग्लेईश व नॉर्वेचे संशोधक डॉ. बर्जर सॉरेन्सेन या दोघांनी लिहिला आहे. 22 पानांच्या या लेखात या दोन्ही संशोधकांनी चीनचे संशोधक अमेरिकेतील काही विद्यापीठांच्या सहकार्याने कोरोना विकसित करण्यासाठी धडपडत होते, असा दावा करण्यात आला आहे. चीनच्या संशोधकांनी प्रयोगशाळेत कोरोनाची निर्मिती केली आणि त्यावर रिव्हर्स इंजिनिअरिंग करून हा विषाणू वटवाघळातून मानवात संक्रमित झाल्याचा आभास निर्माण केला, असा आरोप या दोन्ही संशोधकांनी केला.

कोरोनाबाबतची चीनची लपवाछपवी ‘चेर्नोबिल’ इतकीच भयंकर - ब्रिटनच्या माजी मंत्र्यांचा ठपकाया भयंकर कारस्थानाची माहिती उघड करणारे संशोधक चीनमधून संशयास्पदरित्या गायब झाले आहेत, याकडे प्रोफेसर अँगस डॅलग्लेईश व डॉ. बर्जर सॉरेन्सेन यांनी लक्ष वेधले. याआधी ब्रिटनच्या वर्तमानपत्रांनी कोरोनाच्या साथीवरून चीनला धारेवर धरले होते. आता तर ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनाही कोरोना चीननेच पसरविल्याची खात्री पटलेली असल्याच्या बातम्या येत आहेत. नाव उघड न करता ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी ही बाब मान्य करू लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात ब्रिटन या साथीवरून चीनच्या विरोधात ठाम भूमिका स्वीकारण्याची तयारी करीत असल्याचे दिसते. ब्रिटनचे माजी मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी कोरोनाबाबत चीन करीत असलेली लपवाछपवी ही चेर्नोबिल आण्विक दुर्घटनेइतकीच भयंकर बाब असल्याचा आरोप केला.

1986 साली सोव्हिएत रशियाच्या चेर्नोबिल येथील अणुप्रकल्पात अपघात झाला होता. पण सुरूवातीच्या काळात सोव्हिएत रशियाने असे काही झालेलेच नाही, असे सांगून ही माहिती दडपण्याचा प्रयत्न केला. पण या आण्विक अपघाताने भयंकर स्वरुप धारण केल्यानंतर त्याची कबुली देणे रशियाला भाग पडले होते. सोव्हिएत रशियाप्रमाणे कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही असलेला चीन कोरोनाच्या साथीबाबत असेच धोरण स्वीकारत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या या गोपनीयतेची फार मोठी किंमत आपण सारे चुकती करीत आहोत. म्हणूनच कोरोनाच्या साथीची संपूर्ण व निष्पक्ष तपासाची आवश्यकता आहे, अशी मागणी डेव्हिड डेव्हिस यांनी केली.

दरम्यान, कोरोनाच्या साथीवरून चीनला धारेवर धरणारे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी पुन्हा एकदा चीनवर गंभीर आरोप केले. वुहानच्या प्रयोगशाळेत लष्करी संशोधन सुरू होते, असे पॉम्पिओ म्हणाले. याची माहिती देण्यास चीन नकार देत आहे, असा ठपका पॉम्पिओ यांनी ठेवला आहे.

leave a reply