चीनच्या लष्कराला तैवानबरोबरच्या युद्धासाठी सुसज्ज राहण्याचे आदेश

बीजिंग – युक्रेनचे युद्ध आणि उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतलेले असताना, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी पूर्णपणे सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. सामरिक सामर्थ्य वाढवित नेल्यास कुठल्याही शत्रूला रोखता येऊ शकते, असा संदेश राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी लष्कराला दिला. त्याचवेळी चीनची तब्बल ४६ लढाऊ विमाने आणि चार विनाशिकांनी तैवानच्या आखाताजळवून धोकादायक गस्त घातल्याचा आरोप तैवानने केला आहे.

गेल्या महिन्यात कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीदरम्यान राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्धाची सज्जता ठेवण्याचे निर्देश दिले होते. आपल्या अपारदर्शी व्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेल्या कम्युनिस्ट राजवटीने यासंबंधी माहिती उघड केली नव्हती. पण दोन दिवसांपूर्वी चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. ‘तैवानप्रकरणी हस्तक्षेप करणाऱ्या कुठल्याही परकीय शक्तीचा सामना करण्यासाठी, त्यांना उत्तर देण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे.

लष्कराने कुठल्याही परिस्थितीत सुसज्ज रहावे, युद्धाची तयारी ठेवावी’, असा संदेश चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे प्रमुख मेजर जनरल लियु यांतोंग यांनी सदर मासिकातून दिला. तर याच मासिकात चीनच्या माजी वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल शु किलियांग यांनी देखील लष्कराला तैवानमधील स्वातंत्र्याची मागणी करणारे बंडखोर व त्यांना पाठिंबा देणाऱ्या परकीय शक्तींविरोधी संघर्षासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करून युद्धसज्जता वाढविण्याचा संदेश दिला.

चीनच्या लष्कराचे माजी उपप्रमुख जनरल किलियांग यांनी लष्कराला अपारंपरिक युद्धासाठीही तयार राहण्याची सूचना केली. यासाठी किलियांग यांनी जगभरात सुरू असलेल्या युद्धांचे उदाहरण दिले. त्याचबरोबर चीनच्या लष्कराने आण्विक सामर्थ्य वाढविण्यावर भर द्यावे, असे किलियांग यांनी सुचविले.

दरम्यान, गेल्याच महिन्यात शी जिनपिंग यांनी चीनची कम्युनिस्ट पार्टी व लष्करावरील पकड अधिक मजबूत केली. त्याचबरोबर आपल्या धोरणांना विरोध करणाऱ्या नेत्यांनाही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी हलकेच बाहेर केल्याचे जगाने पाहिले आहे. अशाप्रकारे चीनची एकहाती सत्ता असलेले राष्ट्राध्यक्ष जिनपिंग लवकरच तैवानवर हल्ला चढविण्याची आगळीक करू शकतात किंवा तैवानची कोंडी करू शकतात, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी दिला होता. हाँगकाँगस्थित वर्तमानपत्राने यासंबंधी बातमी प्रसिद्ध करून हा इशारा प्रत्यक्षात उतरत असल्याचे म्हटले आहे.

leave a reply