भूतानची आघाडी उघडून भारतावर दडपण टाकण्याचा चीनचा डाव

नवी दिल्ली – लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य वर्चस्व गाजवित असून चिनी लष्कराची अवस्था यामुळे बिकट बनल्याचा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय माध्यमे नोंदवित आहेत. ही बाब आपल्या जनतेच्या ध्यानात येऊ नये, यासाठी चीनची कम्युनिस्ट राजवट भारताच्या विरोधात जहरी अपप्रचार करीत आहे. त्याचवेळी लडाखच्या सीमेवरुन भारताचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी चीनने भूतान नजिकच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. भूतान सारख्या छोट्या देशाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या भारतावर यामुळे अधिकच लष्करी ताण येईल, असा तर्क यामागे आहे.

भारतावर दडपण

गेल्या सात महिन्यापासून लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात भारतीय लष्कराने स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चीनला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. विशेषत: गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर भारताने केलेल्या लष्करी हालचाली चीनच्या चिंतेत भर घालत आहेत. त्यातच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोक्याच्या टेकड्या बळकाविण्याच्या चीनच्या लष्कराचा कट भारतीय सैन्याने हाणून पाडला व या टेकड्यांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. भारतीय सैन्याच्या पथकाने केलेल्या या पराक्रमाची दखल अमेरिका व युरोपिय देशांनी घेतली आहे. या संघर्षात भारतीय सैन्य गाजवित असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा निष्कर्ष पाश्चिमात्य देशातील मान्यताप्राप्त अभ्यासगट देत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही भारतीय सैन्याने चिनी लष्कराला जबरदस्त प्रत्युत्तर दिल्याचे दावे केले आहेत. यामुळे भारताच्या विरोधात चमकदार लष्करी कारवाई करण्याचे दडपण चीनवर आले आहे.

भारतीय सैन्याच्या नियंत्रणाखाली असलेला भूभाग व मोक्याच्या टेकड्या परत मिळविण्यासाठी चीनचे लष्कर धडपडत आहे. पण सतर्क भारतीय सैनिकांकडून हे डाव उधळण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत, चीनने अरुणाचल प्रदेशच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची आघाडी उघडण्याची धमकी देऊन भारताल विचलित करण्याचा पराक्रम करून पाहला. आता भूतान लगतच्या सीमेवर चीन लष्करी तैनाती वाढवित आहे. उभय देशांमध्ये झालेल्या करारानुसार, भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे भारतावरच आहे. म्हणूनच २०१७ साली भूतानच्या सीमेत घुसखोरी करू पाहणार्‍या व इथे रस्त्यांचे बांधकाम करणार्‍या चिनी लष्कराला भारतीय सैन्याने रोखले होते. डोकलाममध्ये सत्तर दिवसांहून अधिक काळ भारत व चीनचे सैन्य एकमेकांसमोर खडे ठाकले होते आणि चीनच्या लष्कराला इथून माघार घ्यावी लागली होती. लडाखमध्ये संघर्ष पेटण्याच्या स्थितीत असताना चीनचे लष्कर भूतानच्या सीमेवर आणखीन एक आघाडी उघडून भारताला नवे आव्हान देऊ पाहत आहे.

चीनकडून अशा डावपेचांचा वापर केला जाऊ शकतो, याची भारतीय सैन्याला कल्पना असल्याने चीनला काटशह देण्याची पूर्वतयारी भारताने याआधीच केल्याचे दावे माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. त्याचवेळी भारतीय सैन्याकडून मिळत असलेल्या प्रत्युत्तरामुळे चीनवरील ताण प्रचंड प्रमाणात वाढला असून त्यामुळेच चीन वेगवेगळ्या आघाड्या उघडत आहे. म्हणूनच भारताने आपली लष्करी आक्रमकता कायम ठेवावी आणि चिनी लष्कराला जराही उसंत देण्याची संधी देऊ नये, असे या माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आक्रमकता कमी करावी, यासाठी चीनने मॉस्कोमध्ये भारताशी राजनैतिक चर्चेचा आग्रह धरला होता. भारताला चर्चेत गुंतवून बेसावध ठेवायचे आणि त्याचा लाभ घेऊन लष्करी मुसंडी मारायची, असा चीनचा डाव होता. आजवर चीन असेच विश्वासघातकी धोरण अवलंबत आला. पण आता चीनला तशी संधी देण्याची चूक भारताने करता कामा नये, असे लष्करी विश्लेषक बजावत आहेत.

पुढच्या काळात कोंडी झालेली चीनची कम्युनिस्ट राजवट भारताला कुठल्याही पातळीवर धक्का देण्याचा प्रयत्न करू शकते. मात्र, जागतिक जनमत आपल्या विरोधात गेलेले आहे, याचीही जाणीव चीनच्या राजवटीला झालेली आहे. यामुळेच चीनच्या कारवायांना फार मोठ्या मर्यादा येत आहेत. अशा काळात भारताने आपली भूमिका अधिक आक्रमक करावी आणि चीनला ताळ्यावर आणावे, अशी अपेक्षा चीनच्या दडपणाखाली असलेल्या आशियाई देशांकडून व्यक्त केली जात आहे.

leave a reply