चीनचे वरिष्ठ सल्लागार वँग यी रशिया दौऱ्यावर

BELGIUM-DEFENCE-NATOमॉस्को/बीजिंग – युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया व चीनमधील सहकार्य नव्या उंचीवर पोहोचल्याची ग्वाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे वरिष्ठ सल्लागार वँग यी रशिया दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन व परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांची भेट घेतली. यावेळी दोन देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यासंदर्भातील मुद्यांवर चर्चा झाल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात आले. रशिया-चीनमधील या वाढत्या जवळिकीने पाश्चिमात्य आघाडी अस्वस्थ झाली असून चीनवर दडपण आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी चीन रशियाला शस्त्रपुरवठा करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला होता. चीनने हा आरोप नाकारला असला तरी रशियाबरोबरील सहकार्य अधिक घट्ट करण्यापासून मागे हटणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिनपिंग यांचे वरिष्ठ सल्लागार असलेले यी रशिया दौऱ्यावर दाखल झाले आहेत.
दौऱ्यादरम्यान वँग यी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली.

adviser Wang Yi visits Russiaपुतिन यांनी आपण चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचे उद्गार काढल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली. जिनपिंग पुढील महिन्यात रशियाचा दौरा करणार आहेत. युक्रेन युद्धाला वर्ष उलटल्यानंतर जिनपिंग यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या वर्षभरात चीनने आर्थिक, व्यापारी तसेच लष्करी आघाडीवर रशियाला मोठ्या प्रमाणात सहाय्य केले आहे. हेच सहाय्य पुढे चाली राहणार असल्याचे संकेत यी व त्यापाठोपाठ जिनपिंग यांच्या संभाव्य दौऱ्यातून मिळतात.

रशिया व चीनमधील या जवळिकीवर नाटोकडून प्रतिक्रिया उमटली आहे. चीन रशियाला लष्करी सहाय्य पुरविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केला. अमेरिका व नाटोला यासंदर्भात माहिती मिळाली असल्याचेही स्टॉल्टनबर्ग यांनी सांगितले.

leave a reply