कम्युनिस्ट राजवटीला विरोध करणार्‍या परदेशातील १० हजार चिनी नागरिकांना जबरदस्तीने मायदेशी आणले

- युरोपियन स्वयंसेवी गटाचा दावा

१० हजार चिनीमाद्रिद/बीजिंग – चीनमधून परदेशात स्थलांतरित झालेल्या व कम्युनिस्ट राजवटीला विरोध करणार्‍या जवळपास १० हजार चिनी वंशाच्या नागरिकांना जबरदस्तीने माघारी आणल्याची माहिती उघड झाली आहे. ‘ऑपरेशन फॉक्स हंट’ व ‘ऑपरेशन स्कायनेट’ या दोन मोहिमांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशावरून ही मोहीम राबविण्यात आल्याचे समोर येत आहे. स्पेनमधील ‘सेफगार्ड डिफेन्डर्स’ या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला असून उघड झालेली आकडेवारी हे हिमनगाचे टोक असू शकते, असा दावा केला आहे.

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रभाव व दबदबा कायम ठेवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. यासंदर्भातील अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षात सातत्याने समोर येत असून चिनी राजवटीकडून राबविण्यात येणार्‍या मोहिमा व कार्यक्रमांविरोधात तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. ‘सेफगार्ड डिफेन्डर्स’ या स्वयंसेवी संस्थेने तयार केलेला अहवाल अशाच प्रयत्नांचा भाग मानला जातो.

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनची सूत्रे हाती घेतल्यापासून भ्रष्टाचारविरोधी कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक मोहिमा सुरू केल्या होत्या. ‘ऑपरेशन फॉक्सहंट’ व ‘ऑपरेशन स्कायनेट’ त्याचाच भाग आहे. या मोहिमांच्या माध्यमातून जिनपिंग यांनी कम्युनिस्ट राजवटीला विरोध करणार्‍या व परदेशात सक्रिय असणार्‍या चिनी वंशाच्या नागरिकांना माघारी आणण्याची आक्रमक मोहीम राबविली. यासाठी चीनचे एजंटदेखील परदेशात पाठविण्यात आले होते, असे ‘सेफगार्ड डिफेन्डर्स’च्या अहवालात सांगण्यात आले आहे.

१० हजार चिनीचिनी यंत्रणांनी तीन मार्गांचा वापर करून परदेशातील चिनी वंशाच्या नागरिकांना माघारी आणल्याचे ‘सेफगार्ड डिफेन्डर्स’ने म्हटले आहे. संबंधित व्यक्तीच्या चीनमधील नातेवाईकांना धमकावणे व तुरुंगात टाकणे, परदेशात एजंट पाठवून संबंधित व्यक्तीवर दडपण टाकणे आणि सरसकट अपहरण करणे या माध्यमातून जवळपास १० हजार चिनी वंशाच्या नागरिकांना माघारी आणले गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. चिनी यंत्रणांकडून यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या माहितीत गुन्हेगारांना माघारी आणल्याचा दावा करण्यात आला आहे.

मात्र ‘ऑपरेशन फॉक्स हंट’ व ‘ऑपरेशन स्कायनेट’च्या माध्यमातून माघारी आणलेल्यांमध्ये उघुरवंशिय तसेच जिनपिंग यांना विरोध करणार्‍यांचा समावेश असल्याचेही उघड झाले आहे. त्यासाठी प्रसंगी परदेशातील सुरक्षायंत्रणांचीही मदत घेतली गेल्याचे स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. अमेरिकेसह युएई, इजिप्त यासारख्या देशांमध्ये चीनने अशा प्रकारच्या कारवाया केल्याचे समोर येत आहे. चीनने जवळपास १२० देशांमध्ये मोहीम राबविल्याची माहितीही समोर येत आहे. ‘सेफगार्ड डिफेन्डर्स’ आपल्या अहवालात या मोहिमांचा उल्लेख करताना कम्युनिस्ट राजवटीचे परदेशातील ‘लॉंग आर्म पोलिसिंग’ असे म्हटले आहे.

चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या या कारवायांमुळे अनेक देशांचे सार्वभौमत्त्व धोक्यात आले असून मानवाधिकारांचेही मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले आहे, असा आरोप युरोपियन स्वयंसेवी संस्थेने केला आहे.

leave a reply