अफगाणिस्तानतील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून लष्करी संघर्षासाठी सज्ज राहण्याचे संकेत

संघर्षासाठी सज्जबीजिंग/काबुल – अमेरिका अफगाणिस्तानमधून माघार घेत असतानाच चीनने लष्करी संघर्षासाठी सज्ज रहावे, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले आहे. अमेरिकेच्या माघारीमुळे झिंजिआंगमधील उघुरवंशियांना तळ मिळेल, असा दावा चिनी राजवटीकडून करण्यात येतो. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून करण्यात आलेले आवाहन लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. मात्र चीनची ही भूमिका दुटप्पी असल्याचे समोर येत असून, अफगाण संघर्षावर चिंता व्यक्त करणारा चीन तालिबानला प्रगत क्षेपणास्त्रे पुरविण्याची तयारी करीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

गेल्या वर्षी अमेरिकेने तालिबानबरोबर करार करून अफगाणिस्तानमधील आपले सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली संघर्षासाठी सज्जहोती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदावर आलेल्या ज्यो बायडेन यांनीही सैन्यमाघारीचा निर्णय कायम ठेवला. मात्र मे महिन्याऐवजी सप्टेंबर महिन्यापर्यंत माघारी पूर्ण होईल, असे जाहीर केले. अमेरिका व नाटो देशांच्या माघारीनंतर तालिबान पुन्हा संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अफगाणी यंत्रणा व तालिबानकडून करण्यात येणार्‍या दाव्यांनुसार, 50 टक्क्यांहून अधिक अफगाणिस्तानवर ताबा मिळविण्यात तालिबान यशस्वी ठरला आहे.

या पार्श्‍वभूमीवर, चीननेही इस्लामधर्मिय उघुरवंशियांचा मुद्दा पुढे करून अफगाणिस्तानच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. मात्र त्याचवेळी तालिबानचे समर्थन करणार्‍या पाकिस्तानच्या माध्यमातून चीनने आपले हितसंबंध सुरक्षित राखण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. दुसर्‍या बाजूला चीनने लष्करी तैनाती व संघर्षाचीही तयारी चालू केल्याचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या वक्तव्यावरून समोर येत आहे.

उघुरवंशियांचे हल्ले व अस्थैर्याचे कारण पुढे करून चीन लष्करी सज्जतेची तयारी करीत असला तरी त्याचवेळी तालिबानला सहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतल्याचेही उघड होत आहे. तालिबानच्या शिष्टमंडळाने नुकताच चीनचा दौरा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यात तालिबानच्या नेत्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे प्रगत क्षेपणास्त्रांची मागणी केल्याचे सांगण्यात येते. अफगाणिस्तानमधील माघारीनंतरही अमेरिकेचे तालिबानवरील हवाईहल्ले सुरू असून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चीनने ‘सरफेस टू एअर’(सॅम) क्षेपणास्त्रे द्यावीत, अशी मागणी तालिबानने केली आहे.

अमेरिकेकडून हवाईहल्ल्यांसाठी वापरण्यात येणार्‍या ‘बी-52 बॉम्बर्स’ विमानांचे रडार ‘जॅम’ करणे व ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ क्षमता खिळखिळी करणे हे ‘सॅम’ क्षेपणास्त्रांच्या मागणीचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. माध्यमांनी तालिबानला देण्यात येणारी चिनी क्षेपणास्त्रे कालांतराने पाकिस्तानच्या ताब्यात जाऊ शकतात, असे बजावले आहे. त्याचवेळी चीनने तालिबानला हे सहाय्य पुरविले तर त्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया येऊ शकते.

leave a reply