‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात चीनच्या लढाऊ विमानाने अमेरिकेच्या टेहळणी विमानाला ‘वॉर्निंग’ दिली

चीनच्या लढाऊ विमानाने

वॉशिंग्टन – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या चीनच्या लढाऊ विमानाने अमेरिकेच्या टेहळणी विमानाजवळून धोकादायक प्रवास केला. त्याचबरोबर सदर विमान आणि विनाशिकेने अमेरिकेच्या टेहळणी विमानाला ‘वॉर्निंग’ दिल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे विमान चीन दावा करीत असलेल्या हवाईहद्दीजवळ नसतानाही चीनच्या संरक्षणदलांनी ही आगळीक केल्याचा आरोप अमेरिकेने केला. तर अमेरिकी विश्लेषक साऊथ चायना सीच्या वादग्रस्त क्षेत्रात चीन वर्चस्व गाजविण्याच्या तयारीत असल्याचे यामुळे पुन्हा अधोरेखित झाले, असा दावा करीत आहेत.

चीनच्या लढाऊ विमानाने

‘साऊथ चायना सी’मधील ‘नाईन डॅश लाईन’च्या क्षेत्रावर चीनने आपला दावा सांगितला आहे. व्हिएतनाम, फिलिपाईन्स व मलेशियाचे या सागरी व हवाई क्षेत्रातील अधिकार चीनला अजिबात मान्य नाहीत. काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फिलिपाईन्सच्या बाजूने दिलेला निकालही चीनने पायदळी तुडविला आहे. त्याचबरोबर आपल्या परवानगीशिवाय कुठल्याही देशाच्या लष्करी तसेच प्रवासी विमानाने या क्षेत्रातून प्रवास करू नये, अशी ताकीद चीनने दिली आहे.

चीनच्या लढाऊ विमानाने

पण आंतरराष्ट्रीय सागरी व हवाई वाहतुकीचे स्वातंत्र्य अधोरेखित करून अमेरिकेने या क्षेत्रातील आपली हवाई तसेच सागरी गस्त सुरू ठेवली आहे. यामुळे अमेरिका व चीनची लढाऊ विमाने आमनेसामने आल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. तर काही वेळेस चीनच्या लढाऊ विमानाने अमेरिकेच्या गस्ती विमानाजवळून धोकादायक प्रवास केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच चीनच्या विनाशिकांनी फिलिपाईन्स गस्तीनौका आणि ऑस्ट्रेलियन हेलिकॉप्टर्सच्या दिशेने लेझर लाईट्स रोखल्याचे आरोप झाले होते.

मात्र शुक्रवारी येथील हवाई तसेच सागरी क्षेत्रात अमेरिकेच्या टेहळणी विमानाला आव्हान देणारी घटना घडली. अमेरिकन नौदलाचे ‘पोसायडन’ टेहळणी विमान साऊथ चायना सीच्या क्षेत्रातून प्रवास करीत असताना चीनच्या जे-11 या लढाऊ विमानाने अमेरिकन विमानाचा मार्ग रोखला. तसेच चीनची हवाईहद्द 12 नॉटिकल मैल अंतरावर असल्याचा इशारा दिला. यानंतरही अमेरिकन विमानाने प्रवास सुरू ठेवल्यास यापुढील परिणामांना सदर विमानच जबाबदार असेल, असा इशारा चीनच्या लढाऊ विमानाने दिला.

हे विमान अमेरिकेच्या टेहळणी विमानापासून अवघ्या 500 फूट अंतरावरुन उड्डाण करीत होते. तसेच चीनचे सदर विमान हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने सज्ज होते, अशी माहिती पोसायडन विमानातून प्रवास करणाऱ्या अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी दिली. त्यामुळे चीनच्या वैमानिकाने दिलेला इशारा अतिशय गंभीर होता, असे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

या इशाऱ्याला काही मिनिटे उलटत नाही तोच, विमानभेदी क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या चीनच्या नौदलातील विनाशिकेने याच टेहळणी विमानाला दुसरा इशारा दिला. अमेरिकेच्या विमानाने आपला मार्ग बदलावा अन्यथा धोकादायक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी आणखी एक धमकी देण्यात आल्याचे या वृत्तवाहिनीने सांगितले. पण आपले विमान चीन दावा करीत असलेल्या हवाईहद्दीच्या आसपासही नव्हते, असे पोसायडन विमानाची वैमानिका लेफ्टनंट निकी स्लॉटर हिने म्हटले आहे. याचा दाखला देऊन चीनचे विमान व विनाशिका अमेरिकन टेहळणी विमानाविरोधात आक्रमकता दाखवित असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे.

दरम्यान, साऊथ चायना सीच्या हद्दीतील ही घटना सर्वसाधारण ठरत नाही. चीनने या क्षेत्रातील आपली विमाने आणि विनाशिकांची तैनाती वाढविली आहे असून याद्वारे चीन अमेरिकेसह इतर देशांना गंभीर परिणामांचे इशारे देत असल्याचा दावा अमेरिकेतील विश्लेषक करीत आहेत.

English हिंदी

leave a reply