राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या युक्रेनमधील दाव्यांवरून अमेरिकी गुप्तचर यंत्रणा नाराज

वॉशिंग्टन – रशिया युक्रेनमध्ये वंशसंहार घडवित आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात केले होते. बायडेन यांच्या या वक्तव्यावर रशियासह युरोपातील काही नेत्यांनी टीका केली होती. राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावरून व्हाईट हाऊस व अमेरिकी गुप्तचर यंत्रणाही नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांकडे असलेली माहिती व बायडेन यांचे वक्तव्य परस्परांशी जुळत नसल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

अमेरिकी गुप्तचर यंत्रणायुक्रेनची राजधानी किव्हजवळील भागातून माघार घेण्याआधी रशियन सैनिकांनी इथे हत्याकांड घडविल्याचा आरोप युक्रेनने केला होता. बुचा व अजून एका भागात युक्रेनी नागरिक तसेच जवानांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत. या घटनांसह रशियाकडून सुरू असणार्‍या जोरदार हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशिया संपूर्ण युक्रेनचा विनाश घडवित असल्याचा आरोप केला होता. या घटनांवरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना युद्धगुन्हेगार ठरवावे, अशी मागणीही बायडेन यांनी केली होती.

राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यांवर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने तसेच व्हाईट हासऊमधील अधिकार्‍यांनीही नाराजी व्यक्त केली. अमेरिकेतील ‘एनबीसी’ या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी दिली आहे. एखादा वांशिक गट अथवा देश पूर्णपणे नष्ट केला जात असेल तर त्याला वंशसंहार म्हणता येईल, पण युक्रेनच्या बाबतीत असे काही घडलेले दिसत नाही, असे अमेरिकेच्या गुप्तचर अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

अमेरिकी गुप्तचर यंत्रणाबायडेन यांच्या उद्गारांमुळे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना त्यांची जबाबदारी पार पाडणे अधिकच कठीण झाल्याचा दावा परराष्ट्र विभागातील अधिकार्‍यांनी केला. त्याचवेळी राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य व गुप्तचर यंत्रणांकडे असलेली माहिती परस्परांशी जुळणारी नसल्याचेही अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. रशियासह काही युरोपिय नेत्यांनीही बायडेन यांच्या वक्तव्यावर यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. बायडेन यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणीही रशियाकडून करण्यात आली होती.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून करण्यात येणारी वक्तव्ये व त्यांच्याच प्रशासनातील विभागाची धोरणे यांच्यात मेळ नसल्याचे यापूर्वीही समोर आले होते. काही महिन्यांपूर्वी बायडेन यांनी तैवान तसेच कोरोनासंदर्भात केलेल्या वक्तव्यांमधून ही बाब उघड झाली होती. यावरून बायडेन यांच्या क्षमतेवर सवालही उपस्थित करण्यात आले आहेत.

leave a reply