पाकिस्तानात गृहयुद्धाचा भडका उडाला

- इम्रान खान यांच्या समर्थकांचे लष्करावर हल्ले

इस्लामाबाद – माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानात हिंसाचार आणि जाळपोळ सुरू होती. त्यातच इस्लामाबादच्या उच्च न्यायालयात बोलताना इम्रान खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची चिंता व्यक्त केली. त्यामुळे त्यांचे समर्थक अधिकच भडकले व त्यांनी लष्करी अधिकारी व जवान तसेच सरकारी कार्यालयांवरील हल्ले तीव्र केले. तसेच इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने देशभरात तैनाती सुरू केली असून कायदा हाती घेऊ पाहणाऱ्या कुणाचाही गय केली जाणार नाही, असे धमकावले आहे. तसेच पाकिस्तानच्या शत्रूंना गेल्या ७५ वर्षात जे करणे शक्य झाले नाही, ते सत्तेला हापापलेल्यांनी नेत्यांनी करून दाखविले. ९ मे हा पाकिस्तानच्या इतिहासातील काळा दिवस ठरेल, असे लष्कराने म्हटले आहे. आपल्या देशात गृहयुद्ध पेटल्याची कबुलीच याद्वारे पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे.

पाकिस्तानात गृहयुद्धाचा भडका उडाला - इम्रान खान यांच्या समर्थकांचे लष्करावर हल्लेमंगळवारी ९ मे रोजी इम्रान खान यांना गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक झाली. बुधवारी त्यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर करण्यात आले. इथे त्यांनी गेल्या २४ तासात आपला छळ झाल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर आपला संथपणे मृत्यू घडवून आणणारे इंजेक्शन देण्याची तयारी केली जात आहे, असे इम्रान खान पुढे म्हणाले. त्यांच्या या दाव्यानंतर खान यांच्या समर्थकांनी देशभरात सुरू असलेली निदर्शने अधिकच तीव्र केली. लाहोर, कराचीसह पाकिस्तानातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये खान यांच्या समर्थकांनी जाळपोळ सुरू केली. विशेषतः पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांची घरे व जवानांना खान यांच्या समर्थकांनी लक्ष केले. काही ठिकाणी तर पाकिस्तानी जवानांवर जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याची वेळ ओढावली. तसेच पोलीस दलावर देखील निदर्शक हल्ले चढवित आहेत.

यानंतर पाकिस्तानच्या यंत्रणांनी इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते व माजी अर्थमंत्री अस्सद उमर व माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांना अटक केली. तसेच हजाराहून अधिक दंगेखोरांना अटक करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. पाकिस्तानात गृहयुद्धाचा भडका उडाला - इम्रान खान यांच्या समर्थकांचे लष्करावर हल्लेयामुळे निदर्शक अधिकच चवताळले आणि त्यांनी लष्कराच्या विरोधात अधिक आक्रमक घोषणा देऊन हल्ल्यांचे नवे सत्र सुरू केले. काही ठिकाणी लष्कराच्या जवानांवर गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत नेमका किती जणांचा बळी गेला, याची खात्रीलायक आकडेवारी समोर आलेली नाही. पण यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा जगभरात नाचक्की झालेली आहे.

अण्वस्त्रधारी देश म्हणून जगभरात मिरविणारा पाकिस्तान देशात कायदा व सुव्यवस्था राखू शकत नाही, हे जगासमोर आले आहे. इतकेच नाही तर यापुढे पाकिस्तान अण्वस्त्रे सुरक्षित राखू शकेल का, असा सवाल केला जात आहे. अमेरिका व ब्रिटनने पाकिस्तानातील या घडामोडींवर चिंता व्यक्त केली. तर पाकिस्तानच्या लष्कराने सत्तेसाठी हापापलेल्या नेत्यांमुळे गेल्या ७५ वर्षात शत्रूला जे घडविणे शक्य झाले नाही, पाकिस्तानात घडत आहे, अशी खंत व्यक्त केली. संकुचित राजकीय स्वार्थासाठी देशहिताचा बळी दिला जात आहे, असा ठपका पाकिस्तानी लष्कराची माध्यमविषयक शाखा असलेल्या आयएसपीआरने म्हटले आहे.

पाकिस्तानात गृहयुद्धाचा भडका उडाला - इम्रान खान यांच्या समर्थकांचे लष्करावर हल्लेव्यापक देशहिताचा विचार करून पाकिस्तानी लष्कराने आपल्यावरील हल्ल्यांना मोठ्या संयमाने तोंड दिले. यामुळे आपला लौकिक बाधित होत आहे, याचाही विचार पाकिस्तानी लष्कराने केला नाही. पण आता मात्र असे हल्ले चढविणाऱ्यांवर कठोर केली जाईल. कुणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे आयएसपीआरने बजावले. दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर ओमानचा दौरा सोडून मायदेशी परतले आहेत. तर पंतप्रधान शाहबाज शरीफ देशात गृहयुद्ध भडकलेले असताना अजूनही लंडनमध्येच असल्याचे सांगितले जाते.

पाकिस्तानात हिंसाचार पेटलेला असताना या देशातून बाहेर पडण्यासाठी शर्यत सुरू झाली आहे. ज्या कुणाला शक्य आहे त्या प्रत्येक पाकिस्तानी इसमाने दुसऱ्या देशाचा पासपोर्ट मिळविला आहे. अशी मंडळी या देशातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असल्याचा दावा केला जातो. यामुळे पाकिस्तानला आता भवितव्यच राहिले नसल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

हिंदी

 

leave a reply