अफगाणिस्तानात तालिबान आणि आयएस-खोरासनमध्ये संघर्ष सुरू

आयएस-खोरासनकाबुल – ‘आयएस-खोरासन’चा तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा तालिबानने रविवारी केला होता. पण मंगळवारी संध्याकाळी कुनार प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांच्या गस्तीपथकावर हल्ला चढवून आयएसच्या दहशतवाद्यांनी तालिबानचा दावा निकालात काढला. आयएसच्या या हल्ल्यात तालिबानची मोठी हानी झाल्याचे बोलले जाते. जलालाबाद येथेही आयएसच्या हल्ल्यात तालिबानचे दोन दहशतवादी ठार झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पण तालिबानने या बातम्यांवर बोलण्याचे टाळले. मात्र आयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केल्याची घोषणा तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने केली.

५ ऑक्टोबर रोजी काबुलच्या प्रार्थनास्थळाच्या आवारात दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटात १२ जणांना ठार केले होते. यामध्ये तालिबानच्या सात दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. यानंतर तालिबानने काबुलच्या एका भागात केलेल्या कारवाईत ‘आयएस-खोरासन’च्या ११ दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर या कारवाईत आयएसचा तळ नष्ट केल्याचा दावाही तालिबानने केला होता.

आयएस-खोरासनयाशिवाय मंगळवारी रात्री काबुलच्या पघम जिल्ह्यात केलेल्या कारवाईत आयएसच्या चार दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने म्हणाला. तालिबान अफगाणिस्तानात आयएसचे कंबरडे मोडत असल्याचा दावा पाकिस्तानातील कट्टरपंथी करीत आहेत. पण गेल्या चोवीस तासात तालिबानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करून आयएसने अफगाणिस्तानातील तालिबानविरोधी संघर्ष इतक्यात संपणार नसल्याचे दाखवून दिले.

आयएस-खोरासनपाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या अफगाणिस्तानातील कुनार आणि नांगरहार प्रांतात आयएसने तालिबानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले. यापैकी कुनार प्रांतातील हल्ल्यात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सुरुवातीला तालिबानच्या वाहनाला लक्ष्य केले. या हल्ल्यात तालिबानचे दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जातो. त्यानंतर घटनास्थळी तालिबानच्या दहशतवाद्यांची कुमक दाखल झाल्यानंतरही आयएसने त्यांच्या वाहनावर हल्ला चढविला. यातही तालिबानचे दहशतवादी ठार झाल्याचे बोलले जाते.

तर बुधवारी सकाळी नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबाद येथे गेल्या काही दिवसांपासून तालिबानच्या दहशतवाद्यांवर हल्ले सुरू झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये तालिबानचे दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी तसेच रुग्णालयाच्या अधिकार्‍याने दिली. तालिबानने कुनार तसेच जलालाबाद बाबत बोलण्यास नकार दिला आहे. पण अफगाणिस्तानच्या किमान तीन प्रांतात तालिबान आणि आयएसच्या दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे यातून उघड झाले आहे.

याशिवाय राजधानी काबुलमध्ये तालिबानच्या राजवटीविरोधातील निदर्शने सुरूच आहेत. तालिबानने महिलांवर टाकलेल्या निर्बंधांविरोधात विद्यापीठाच्या प्राध्यापकाने आपल्या परिवारासह काबुलच्या रस्त्यांवर हातात बॅनर घेऊन निदर्शने केली. तालिबानने अफगाणी जनतेचे अधिकार हिसकावून घेतल्याची टीका प्राध्यापक मोहम्मद वतनदोस्त यांनी स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

leave a reply