जम्मू-काश्मीरमध्ये लश्कर-ए-तोयबा व हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये संघर्ष पेटणार

जम्मू-काश्मीरमध्ये लश्कर-ए-तोयबा व हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये संघर्ष पेटणार

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये ‘दि रेझिस्टन्स फ्रंट'(टीआरएफ) नवी दहशतवादी संघटना उभी राहिली आहे. टीआरएफला ‘लश्कर-ए-तोयबा’चे सहाय्य मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हिजबुल मुजाहिद्दीनचा कंमाडर असलेल्या अब्बास शेख याने ही संघटना सोडून तो ‘टीआरएफ’मध्ये सामील झाला. त्यालाच टीआरएफचा कंमाडर घोषित करण्यात आले आहे. या नव्या दहशतवादी संघटनेमुळे लश्कर-ए-तोयबा व हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये संघर्ष सुरू झाल्याचे दिसते.

शुक्रवारी ‘टीआरएफ’ने एक पोस्टर प्रसिद्ध केले. यात हिजबुल मुजाहिद्दीनचा ऑपरेशनल कंमाडर अब्बास याने आपण ‘टीआरएफ’मध्ये दाखल झाल्याचा दावा केला आहे. याआधी हिजबुल मुजाहिद्दीनने जम्मू काश्मीरचे पोलीस दल तसेच सर्वसामान्य काश्मिरी जनतेवर अत्याचार केले होते. ही बाब आपल्याला मान्य नसल्याचे सांगून, अब्बास शेख याने हिजबुल मुजाहिद्दीन सोडून ‘टीआरएफ’मध्ये प्रवेश केला, असे सांगितले जाते. आपल्या १२ साथीदारांना घेऊन अब्बास शेख ‘टीआरएफ’मध्ये आल्यानंतर त्याच्यावरील हिजबुलच्या हल्ल्याची शक्यता बळावली आहे.

‘टीआरएफ’ या नव्याने उभ्या राहिलेल्या दहशतवादी संघटनेमागे ‘लश्कर-ए-तोयबा’ असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अब्बास शेख लश्करमध्येच भरती झाला आहे व ही बाब लश्करची प्रतिस्पर्धी मानली जाणारी हिजबुल मुजाहिद्दीन खपवून घेणे शक्य नाही. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना आपण काश्मीरच्या तथाकथित स्वातंत्र्यासाठी लढत असल्याचा दावा करीत असल्य तरी त्यांच्यात फार मोठा संघर्ष सुरू असतो, ही बाब यामुळे नव्याने समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारताने हटविल्यानंतर सर्वच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी भारताच्या विरोधात एकजूट करण्याची तयारी केली होती. या सर्व संघटना एकत्र येऊन नवे दहशतवादी पथक स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे अहवाल भारताच्या गुप्तचर विभागाने दिले होते. पण आता या दहशतवादी संघटनामध्ये एकी राहिलेली नसल्याचे नव्याने उघड होत आहे. मात्र खरोखरच लश्कर-ए-तोयबा व हिजबुल मुजाहिद्दीन यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे की ही भारतीय सुरक्षा दलांना गुंगारा देण्यासाठी आखलेला कट आहे, हे कालांतराने स्पष्ट होईल.

भारतीय सुरक्षा दलाने मात्र जम्मू-काश्मीरमध्ये कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेणार नाही, असे आक्रमक धोरण स्वीकारले असून दहशतवाद्यांना संपविण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. दहशतवाद्यांच्‍या विरोधातील ही आक्रमक मोहीम यापुढेही तितक्याच आक्रमकपणे राबविली जाईल, अशी ग्वाही भारताचे वरिष्ठ लष्करी अधिकारी देत आहेत. यामुळे अब्बास शेख सारख्या दहशतवादाने दुसऱ्या दहशतवादी संघटनेत प्रवेश केला तरी त्याने सुरक्षा दलाच्या धोरणात बदल होणार नाही, असे स्पष्टपणे दिसत आहे.

leave a reply