चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा प्रचार करणाऱ्या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ची यापुढे ‘फॉरेन मिशन’ म्हणून नोंद

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ६० हून अधिक विद्यापीठे व शिक्षणसंस्थांमध्ये कार्यरत राहून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा प्रचार करणाऱ्या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ची यापुढे ‘फॉरेन मिशन’ म्हणून नोंद केली जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली आहे. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी व त्याच्या उपक्रमांकडून करण्यात येणाऱ्या प्रचारापासून अमेरिकेतील विद्यापीठे आणि विद्यार्थी मुक्त रहावेत यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यानी दिली. अमेरिकेचा हा निर्णय चीन-अमेरिका सहकार्याशी निगडित गोष्टींना कलंकित करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे.

'फॉरेन मिशन'

‘”गेल्या चार दशकात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने अमेरिकेतील मुक्त व खुल्या व्यवस्थेचा फायदा उचलून आपली विचारसरणी या देशावर लादण्यासाठी व्यापक प्रचारमोहीम राबवली आहे. ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट यूएस सेंटर’ही याच प्रचारमोहिमेचा भाग असून अमेरिकेतील विद्यापीठे व शाळांमध्ये या संस्थेकडून चिनी राजवटीचा प्रभाव वाढविणाऱ्या कारवाया सुरु आहेत. या संस्थेला संपूर्ण निधी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून पुरविण्यात येतो. हे लक्षात घेऊन यापुढे सदर संस्थेची नोंद अमेरिकेत कार्यरत असणारे परदेशी राजनैतिक कार्यालय म्हणून करण्याचा आदेश देण्यात आला आहे”, या शब्दात परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी चिनी राजवटीविरोधातील कारवाईची धार अधिक तीव्र केल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेतील शिक्षणतज्ञ व शाळांच्या प्रशासनांना चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवायांची माहिती होऊन पुढील निर्णय घेणे सोपे व्हावे यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

'फॉरेन मिशन'

अमेरिकेच्या निर्णयावर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘अमेरिकेने शिक्षणाशी निगडित कार्यक्रमांना राजकीय रंग देणे थांबवावे. दोन देशांमधील नागरिकांमध्ये तसेच सांस्कृतिक क्षेत्रात होणाऱ्या देवाणघेवाणीत हस्तक्षेप करू नये. चीन व अमेरिकी संबंधातील विश्वासार्हता कमकुवत करण्याच्या हालचाली रोखणे आवश्यक आहे’, असे चीनच्या परराष्ट्र विभागाने बजावले. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने चीनच्या नऊ वृत्तवाहिन्या व दैनिकांनाही ‘फॉरेन मिशन’ म्हणून नोंदणी करणे भाग पाडले होते.

दोन वर्षांपूर्वी, अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने, चीनकडून अमेरिकी शिक्षणसंस्था व इतर उपक्रमांमध्ये प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा अहवाल सादर केला होता. यात चीनकडून अमेरिकेतील 100 हून अधिक विद्यापीठांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’चा उल्लेख करण्यात आला होता. या माध्यमातून चीन अमेरिकी विद्यापीठांमध्ये चिनी संस्कृती रुजविण्याचा आणि त्याचवेळी आर्थिक सहाय्याच्या बळावर शिक्षणसंस्थांमध्ये वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा इशारा देण्यात आला होता. अमेरिकेची तपासयंत्रणा ‘एफबीआय’नेही अमेरिकी विद्यापीठांमध्ये चालविण्यात येणार्‍या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ केंद्रांची चौकशी सुरू असल्याचे त्यावेळी झालेल्या संसदीय सुनावणीत सांगितले होते. अमेरिकी यंत्रणांनी ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ चीनसाठी हेरगिरीच्या जागा म्हणून काम करू शकतात, अशी चिंताही व्यक्त केली होती.

leave a reply