कोरोना व रिअल इस्टेट क्षेत्रातील धक्क्यांमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण

रिअल इस्टेटबीजिंग – कोरोनाचे नवे उद्रेक आणि गुंतवणूक, रिटेल, हॉटेलिंग व रिअल इस्टेट क्षेत्रात झालेली घसरण यामुळे चीनची अर्थव्यवस्था पुन्हा मंदावली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहित चीनच्या आर्थिक विकासाचा दर ०.८ टक्क्यांनी खाली आला होता. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर असे सलग दोन महिने चीनच्या अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के कायम असल्याचे नव्या आकडेवारीवरून समोर आले आहे. या धक्क्यांमुळे वर्षअखेरीस चीनच्या आर्थिक विकासाचा दर मंदावू शकतो तसेच पुढील वर्षातही त्याचे पडसाद उमटतील, अशी चिंता विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.

बुधवारी चीनच्या यंत्रणांनी नोव्हेंबर महिन्यातील आर्थिक आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, रिअल इस्टेटसह रिटेल सेल्स, हॉटेलिंग व गुंतवणूक या क्षेत्रांना धक्के बसले आहेत. घरांना असणारी मागणी तसेच त्यांच्या विक्रीत घट झाली असून या क्षेत्रातील गुंतवणुकही कमी झाली आहे. ‘एव्हरग्रॅन्ड क्रायसिस’मुळे घरांच्या किंमती सलग तीन महिने घसरत असून अजून काही महिने हाच काल कायम राहिल, असे संकेत देण्यात येत आहेत. घरांच्या विक्रीत तब्बल २० टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. मालमत्ता क्षेत्रातील गुंतवणूक १.२ टक्क्यांनी खाली आली आहे.

रिटेल सेल्स क्षेत्राचा दर चार टक्क्यांखाली घसरला आहे. हॉटेलिंग व कॅटरिेंग क्षेत्रात अडीच टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. पायाभूत सुविधा व उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीतही घट नोंदविण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादनात जेमतेम वाढ नोंदविण्यात आली असली तरी कोरोनाच्या नव्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर या महिन्यात मोठे धक्के बसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चीनमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तिआंजिन व ग्वांगडॉंगमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याची माहिती चिनी यंत्रणांनी दिली. मात्र गेल्या काही दिवसात चीनच्या उत्पादन व निर्यात क्षेत्राचे प्रमुख केंद्र असणार्‍या झेजिआंगमध्ये नवा उद्रेक समोर आला आहे.

आतापर्यंत या प्रांतात सुमारे २०० रुग्ण आढळले असून स्थानिक प्रशासनाने अनेक कारखान्यांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. निर्यातीचे केंद्र असणार्‍या ‘निन्गबो पोर्ट’मध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले असून जहाजे तसेच मालाच्या वाहतुकीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे चीनमधील अंतर्गत पुरवठा साखळी पुन्हा विस्कळीत होण्याचे संकेत मिळत आहेत.

चीनच्या अनेक शहरांमध्ये ‘झीरो लॉकडाऊन’ लादण्यात आला असून त्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसेल, असा इशारा विश्‍लेषक देत आहेत. २०२१ साली चीनची अर्थव्यवस्था आठ टक्क्यांखाली विकासदर नोंदवेल तर पुढच्या वर्षी पाच टक्क्यांची गती राखणेही मोठी बाब ठरेल, अशी चिंता विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियन विश्‍लेषक क्लिफर्ड बेनेट यांनी, चीनचा आर्थिक विकास दर खाली येणे ही यापुढे कायमस्वरुपी स्थिती असू शकते, असा दावा केला आहे.

leave a reply