देशात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या ३५, रुग्णांची संख्या १४०० वर

नवी दिल्ली, दि. ३१ (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाव्हायरसच्या साथीत बळी गेलेल्यांची संख्या ३५ वर पोहोचली असून रुग्णांची संख्या १४०० च्या पुढे गेली आहे. एका दिवसात रुग्णांची संख्या ३०० पेक्षा अधिकने वाढली. यामध्ये सर्वाधिक खराब स्थिती महाराष्ट्रात आहे. राज्यातील कोरोनाव्हायरसच्या संसर्गित रुग्णांची संख्या ७२ ने वाढून ३०२ झाली आहे. यानंतर तामिळनाडूत चोवीस तासात सर्वाधिक ५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात कोरोनाव्हायरसच्या साथीच्या रुग्णांच्या संख्येत सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात मोठी वाढ दिसून आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी देशात या साथीच्या १,२५१ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती दिली. चोवीस तासात २२७ नवे रुग्ण आढळल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले. काही जणांनी कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती लपविल्याने एका दिवसात येवढे रुग्ण समोर आले. नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने या साथीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे अग्रवाल यांनी अधोरेखित केले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या या माहितीनंतरही देशात विविध राज्यात रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती समोर आली. यानुसार देशातील या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या १४०० पुढे गेली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी दुपारपर्यंत २३० असणारी रुग्ण संख्या सायंकाळी ७२ ने वाढून ३०२ झाली. मंगळवारी आढळलेल्या रुग्णांपैकी ५९ रुग्ण एकट्या एकटया मुंबईत सापडले आहेत. तसेच नगर जिल्ह्यात तीन, पुणे, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्यांचे अहवाल मिळाल्याने रुग्णांच्या संख्या वाढल्याचे सांगितले जाते.

अचानक वाढलेल्या या साथीच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आता भरारी पथके तयार करण्यात आली असून घराघरात जाऊन तपासणी केली जाणार आहे. तसेच कोरोनाविरोधी लढ्याचा हा निर्णायक टप्पा असून कृपया घराबाहेर पडू नका असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले.
महाराष्ट्रानंतर एका दिवसात रुग्ण संख्येत सर्वाधिक वाढ तामिळनाडूत झाली आहे. येथे एका दिवसात ५७ नवे रुग्ण आढळले, तर दिल्लीत एका दिवसात ३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दोन आठवड्यापूर्वी दिल्लीत निजाममुद्दीन येथे एका धार्मिक कार्यक्रमात सुमारे तीन हजारांचा जमाव एकत्र आला होता. यातील ३०० हून अधिक जण परदेशातून आले होते. यापैकी काही जण हे कोरोनाग्रस्त असल्याचा संशय आहे. दिल्ली सरकारने जमावबंदी, त्यानंतर लॉकडाऊन घोषित केल्यावरही हा जमाव येथेच होता. तसेच पंतप्रधानांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यावरही सुमारे १५०० जण या कार्यक्रमाच्या ठिकाणीच वास्तव्य करून होते. कोरोनाव्हायरसची साथ पसरत असताना येथे अक्षम्य बेजवाबदारपणा करण्यात आल्याचे आरोप होत आहे. सोमवारी ही बाब समोर आल्यावर हे कार्यक्रम स्थळ रिकामे करण्यात आले. येथून सुमारे १५०० जणांना बाहेर काढून वेगळे ठेवण्यात आले आहे. यातील ४४१ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याची माहिती दिल्ली सरकराने दिली आहे. येथील चाचणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ३० जण आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत.

याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या १० जणांचा गेल्या तीन दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ६ जण तेलंगणातील आहेत. तर एक जण जम्मू काश्मीरचा आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणासह इतर काही राज्यातून या कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे ही राज्येही हाय अलर्टवर आहेत. तामिळनाडूत अचानक वाढलेल्या रुग्ण संख्येला याच्याशीच जोडून पहिले जात आहे. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि तेथून दुसऱ्या राज्यांमध्ये गेलेल्यांचा शोध सुरु आहे.

leave a reply