दुसऱ्या महायुध्दानंतर “कोरोनाव्हायरस” जगासमोरील भीषण संकट 

न्यूयॉर्क –  “कोरोनाव्हायरसची साथ म्हणजे दुसऱ्या  महायुध्दानंतर जगासमोर खडे ठाकलेले सर्वात मोठे संकट ठरते. अलीकडच्या इतिहासात मानवी समुदायासमोर इतके भयंकर आव्हान खडे ठाकल्याचे दुसरे उदाहरण सापडत नाही, अशा शब्दात संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव ॲन्टोनिओ गुतेरस यांनी साऱ्या  जगात थैमान घालत असलेल्या या साथीवर चिंता व्यक्त केली.

मंगळवारी ॲन्टोनिओ गुतेरस यांनी संयुक्त राष्ट्र संघात  कोरोनाव्हायरसच्या साथीच्या आर्थिक-सामाजिक परिणामांबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात गुतेरस यांनी कोरोनाव्हायरसमुळे जगासमोर उद्भवलेल्या संकटाची तीव्रता मोठ्या गंभीर शब्दात मांडली. कोरोनाव्हायरसमुळे जगात अस्थिरता, अशांतता आणि संघर्ष वाढेल. त्यामुळे या साथीचा मुकाबला करण्यासाठी सर्व राजकीय मतभेद, हेवेदावे बाजूला सारून साऱ्या  जगाच्या एकजुटीची गरज आहे. सारेजण एकत्र येतील तेव्हा मानव जातीचे रक्षण होईल, असे गुतेरस यांनी बजावले आहे.

कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी  काही विकसित देश जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनांचे पालन करीत असून ही साथ रोखण्यासाठी प्रयत्न  करीत आहेत. मात्र  गरीब देशांमध्ये या पातळीवर तितके प्रयत्न होताना दिसत नाही म्हणूनच या देशांमध्ये कोरोनाची साथ रोखण्यासाठी विकसित देशांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गुतेरस यांनी केले आहे.

केवळ या साथीच्या विरोधातच नाही तर कोरोना व्हायरसच्या साथीच्या भयंकर आर्थिक व इतर दुष्परिणामांचा सामना करण्यासाठीही सार्या जगाच्या एकजुटीची आवश्यकता आहे. यामध्ये व्यापक फेररचना व सुधारणांच्या कार्यक्रमांचा समावेश असून यासाठी साऱ्या  जगाने संघटित प्रयत्न करायला हवे असे आवाहन गुतेरस यांनी केले आहे.

leave a reply