कोरोनाच्या नव्या साथीमुळे चीनची कम्युनिस्ट राजवट कोसळेल

- अमेरिकन विश्‍लेषक गॉर्डन चँगचा निष्कर्ष

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘कोरोनाची नवी साथ चीनमध्ये धुमाकूळ घालत आहे. कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिअंटचा फैलाव कसा रोखायचा, ते चीनच्या अजूनही लक्षात आलेले नाही. म्हणूनच चीन जूनाट, रानटी व क्रूर मार्गाने कोरोनाची साथ रोखण्यासाठी धडपडत आहे. यासाठी कडक लॉकडाऊन पर्याय चीनने स्वीकारलेला आहे, पण प्रभावी लस विकसित करून ही साथ रोखण्याची तयारी चीनने केलेली नाही. म्हणूनच कोरोनाच्या या संकटामुळे चीनची कम्युनिस्ट राजवट कोसळण्याची स्थिती उद्भवली आहे’, असा निष्कर्ष अमेरिकेचे विख्यात विश्‍लेषक व स्तंभलेखक गॉर्डन चँग यांनी नोंदविला आहे. चीनने याची गंभीर दखल घेतली असून चँग यांच्यावर चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने सडकून टीका केली आहे.

कोरोनाच्या नव्या साथीमुळे चीनची कम्युनिस्ट राजवट कोसळेल - अमेरिकन विश्‍लेषक गॉर्डन चँगचा निष्कर्षकोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्यात चीनला फार मोठे यश मिळाले, असे दावे करून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आपलीच पाठ थोपटून घेतली होती. अमेरिका व युरोपातील विकसित देशांनाही जे जमले नाही, ते चीनने करून दाखविले, असा दावा कम्युनिस्ट राजवटीकडून केला जात होता. तसेच भारतात करोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चीनची सरकारी माध्यमे शेरेबाजी करीत होते. मात्र आता चीनमध्येच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा उद्रेक झाला असून चीनचे प्रांत व मोठी शहरे याने ग्रासल्याचे दिसत आहे.

सुरूवातीच्या काळात याची माहिती दडविणार्‍या चीनला आता राजधानी बीजिंग वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. गॉर्डन चँग यांनी यावर नेमके बोट ठेवले आहे. चीनचे सत्ताकेंद्र असलेल्या बीजिंगमध्ये अवागमानावर बंदी टाकण्यात आलेली आहे. कोरोनाच्या चाचणीनंतरच बीजिंगमध्ये येण्याची परवानगी यंत्रणांकडून दिली जात आहे. तरीही ही साथ नियंत्रणात ठेवण्यात चीनला यश आलेले नाही, असे गॉर्डन चँग यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. त्याचवेळी कोरोनाचा या क्षेत्रातील फैलाव चीनच्या राजवटीसमोर फार मोठे आव्हान घेऊन आला आहे, याची जाणीव चँग यांनी करून दिली. चीनची कम्युनिस्ट राजवट अजेय आहे, या समजुतीला यामुळे धक्का बसला आणि पुढच्या काळात ही साथ रोखण्यात चीनला अपयश आले तर त्याचे राजकीय परिणाम होतील, असा इशारा गॉर्डन चँग यांनी दिला. या साथीमुळे चीनची कम्युनिस्ट राजवट कोसळू शकते, असा निष्कर्ष गॉर्डन चँग यांनी नोंदविला आहे.

कोरोनाच्या नव्या साथीमुळे चीनची कम्युनिस्ट राजवट कोसळेल - अमेरिकन विश्‍लेषक गॉर्डन चँगचा निष्कर्षअमेरिकन स्तंभलेखकाने दिलेला हा इशारा चीनला चांगलाच खटकल्याचे दिसते. चीनचे सरकारी वर्तमानपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने गॉर्डन चँग यांच्या दाव्यावर आक्षेप घेतला. अमेरिकेचा सहकारी देश असलेला ऑस्ट्रेलिया आपल्या सिडनी शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करीत आहे, याकडे चँग यांचे लक्ष गेलेले नाही, अशी टीका ग्लोबल टाईम्सने केली. त्याचवेळी अमेरिकेतही कोरोनाची साथ नियंत्रणात आलेली नाही, असा टोला या वर्तमानपत्राने लगावला.

अशा परिस्थितीत चीनला पूर्वग्रहदूषित भावनेतून चँग यांनी लक्ष केले आहे, असा आरोप ग्लोबल टाईम्सने केला. त्याचवेळी २००१ सालापासूनच गॉर्डन चँग यांनी चीनची कम्युनिस्ट राजवट कोसळणार अशी भाकिते वर्तविण्याची सुरूवात केली होती, असे सांगून ग्लोबल टाईम्सने या दाव्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. मात्र कोरोनाची नवी साथ चीनसमोरील सर्वात भीषण संकट ठरत असल्याचे संकेत चँग यांनी हा निष्कर्ष नोंदविण्याच्या आधीपासूनच स्पष्ट झाले होते. चीनच्या अर्थव्यवस्थेच्या कामगिरीवर या साथीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे. त्याचवेळी ही साथ रोखण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून सुरू असलेले कडक लॉकडाऊनसारखे प्रकार जनतेमध्ये असंतोष माजवित असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे याचे राजकीय परिणाम होतील, ही गॉर्डन चँग यांनी व्यक्त केलेली शक्यता पूर्णपणे निकालात काढणे अवघड आहे. पण चीनची राजवट हा आपल्या विरोधातील प्रचाराचा भाग असल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करीत असल्याचे दिसते.

leave a reply