भारतातील कोरोनाच्या बळींची संख्या १७ हजारांवर – एकूण रुग्णांची संख्या पावणे सहा लाखांच्या पुढे पोहोचली

नवी दिल्ली – देशात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या १७ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच रुग्णांची संख्या पावणे सहा लाखांवर पोहोचली आहे. मंगळवारी महाराष्ट्रातच २४५ जणांचा बळी गेला. दिल्लीत ६२ जण दगावले, तसेच तामिळनाडूत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. या तीन राज्यांमध्येच एका दिवसात ३६७ जण दगावले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अनलॉक २.०’ बद्दल माहिती देताना जनतेला अधिक दक्ष राहण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासनालाही नियमांचे काटकोर पालन करून घ्या, असे निर्देश दिले आहेत.

रुग्णांची संख्या

देशात मंगळवारच्या सकाळपर्यंत या साथीने दगावलेल्यांच्या संख्या १६,८९३ वर पोहोचली होती. तर चोवीस तासात १८,५५२ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर गेली. तर रात्रीपर्यंत कोरोनाच्या बळींची संख्या १७ हजारांच्या पुढे, तर एकूण रुग्णांची संख्या पावणे सहा लाखांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात २४५ जण दगावले आणि ४,८४८ नवे रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील या साथीने दगावलेल्यांची संख्या ७,८५५ वर, तर एकूण रुग्णांची संख्या पावणे दोन लाखांवर पोहोचली आहे.

दिल्लीत २१९९ नवे रुग्ण आढळले. यामुळे या राज्यातील एकूण रुग्ण संख्या ८७ हजारांच्या पुढे गेली आहे. तामिळनाडूत ४ हजार नवे रुग्ण आढळले, यामुळे या राज्यातील रुग्ण संख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे.

देशभरात रुग्ण संख्यामध्ये मोठी वाढ दिसून येत असून ‘अनलॉक २.०’ चा टप्पा सुरु झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत सोमवारी सूचना जारी केल्या होत्या. तर मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी ‘अनलॉक २.०’ सुरु होत असताना नागरिकांनी आता अधिक सावध राहावे. निष्काळजीपणा करू नये. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्यात जेवढी दक्षता बाळगली. सोशल डिस्टसन्सिंगचे आणि मास्क लावण्याचे नियम पाळले, त्याहून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. तसेच गरीब जनतेसाठी दिवाळीपर्यंत मोफत धान्य वाटपाची घोषणा केली.

leave a reply