जीनिव्हा – ‘कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त हादरा बसला आहे. याचा सर्वाधिक परिणाम आशियाई देशांवर होऊन या देशांची अर्थव्यवस्था कोसळेल आणि एक कोटीहून अधिक जण गरिबीच्या खाईत ढकलले जातील’, असा इशारा जागतिक बँकेने दिला. या साथीचे परिणाम चालू वित्तिय वर्षाप्रमाणे पुढच्या वित्तिय वर्षातही जाणवतील, अशी शक्यता जागतिक बँकेने वर्तविली. दरम्यान, या साथीचे उगमस्थान असणार्या चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर निम्म्यावर येईल, असे या बँकेने बजावले.
जागतिक बँकेने सोमवारी कोरोनाव्हायरस आणि तीन महिन्यांमधील आर्थिक उलथापालथींबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. या वर्षअखेरीपर्यंत चीनवगळता शेजारील ‘ईस्ट-एशिया पॅसिफिक’ क्षेत्रातील विकसनशील देशांचा सरासरी विकासदर २.८ टक्के इतकाच असेल, असे सदर अहवालात म्हटले आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये या साथीचा फैलाव रोखला आणि उद्योगक्षेत्राला चालना मिळाली तरच इतका विकासदर गाठणे शक्य आहे. पण ही साथ यापुढेही चालू राहिली तर, या क्षेत्रातील देशांचा विकासदर आणखी घसरेल, असे या अहवालात बजावण्यात आले आहे.
जागतिक बँकेच्या ‘ईस्ट एशिया अँड पॅसिफिक’ क्षेत्राचे अर्थतज्ञ आदित्य मट्टू यांनी या अहवालाचा दाखला देऊन हा इशारा दिला. ‘या साथीने माजविलेल्या हाहाकारामुळे या क्षेत्रातील देशांचा विकास ठप्प होऊन या देशांमधील गरीबी वाढेल’, असे मट्टू यांनी बजावले आहे. सध्या जगातील दोन तृतियांश लोकसंख्या लॉकडाउनमध्ये आहे. यामध्ये आशियातील देशांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे, मट्टू यांनी लक्षात आणून दिले.
या क्षेत्रातील किमान १७ देशांची अर्थव्यवथा या साथीच्या लॉकडाउनमध्ये सापडण्याची शक्यता असल्याचे मट्टू म्हणाले. या लॉकडाउनमुळे या देशांमधील उद्योगक्षेत्र थंडावले असून व्यापारी दळणवळण, आयात-निर्यात बंद झाली आहे. अशा परिस्थितीत या लॉकडाउन संपवून या देशांची अर्थव्यवथा सावरली नाही, या देशांचा विकासदर ऋण कल दाखवित राहिला तर किमान एक कोटी दहा लाख जण गरीबीच्या गर्तेत ढकलले जातील, असे मट्टू म्हणाले.
त्याचबरोबर, ‘परस्परांवर अवलंबून असलेल्या या जगात देशांच्या अर्थव्यवथा एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे एका देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम दुसर्या देशावरही प्रभाव टाकणारा ठरेल’, असे मट्टू यांनी सांगितले. या साथीतून बाहेर पडायचे असेल आणि आपली अर्थव्यवस्था सावरायची असेल तर दक्षिण कोरियाचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचे मट्टू म्हणाले. या साथीचा फैलाव रोखण्यासाठी दक्षिण कोरियाने तपासणी वाढविली होती, याकडे मट्टू यांनी लक्ष वेधले.