कोरोनाव्हायरस पुढील दशकभर कायम राहिल

- जर्मन कंपनी ‘बायोन्टेक’च्या प्रमुखांचा दावा

बर्लिन – ‘आपल्याला यापुढे नॉर्मल या शब्दाची नवी व्याख्या तयार करावी लागेल. कोरोनाव्हायरस आपल्याबरोबर पुढील १० वर्षे राहणार आहे. पुढील काळात कोरोनाच्या अजून साथी येऊ शकतात आणि आपण त्यासाठी तयार रहायला हवे’, असा दावा जर्मन जैवतंत्रज्ञान कंपनी ‘बायोन्टेक’चे प्रमुख उगुर साहिन यांनी केला. सध्या जगातील विविध देशांमध्ये कोरोना साथीविरोधात लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यातील ‘फायझर’ कंपनीची लस विकसित करण्यात ‘बायोन्टेक’ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे साहिन यांनी केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

गेल्या काही दिवसात कोरोनाव्हायरसचे तीन नवे प्रकार (स्ट्रेन) समोर आले आहेत. त्यात ब्रिटन, दक्षिण आफ्रिका व नायजेरिया या देशांमध्ये आढळलेल्या ‘स्ट्रेन’चा समावेश आहे. त्यातील ब्रिटनमधील कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार वेगाने फैलावत असून ब्रिटनमधील रुग्णांची संख्या गेले काही दिवस वेगाने वाढताना दिसत आहे. सध्या देण्यात येणारी लस या प्रकाराला रोखू शकते अथवा नाही, यावर अजून संशोधन सुरू आहे. मात्र लस विकसित करणार्‍या कंपन्यांनी गरज पडल्यास नव्या ‘स्ट्रेन’चा मुकाबला करण्यासाठी एक ते दोन महिन्यात स्वतंत्र लस विकसित होऊ शकेल, असे संकेत दिले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, कोरोनाव्हायरसवर पहिली लस विकसित करणार्‍या ‘फायझर-बायोन्टेक’पैकी बायोन्टेकच्या प्रमुखांनी व्हायरसबाबत केलेले विधान लक्ष वेधून घेणारे ठरते. उगुर साहिन यांनी पुढील काळात कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी कदाचित ‘लॉकडाऊन’ची आवश्यकता भासणार नाही, असा दावा केला. ‘सध्याच्या काळात रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसणार नाही, मात्र त्यानंतरच्या काळात फैलाव कमी होणे आवश्यक आहे. तसे झाले तरच पुढील वर्षाच्या अखेरीस परिस्थिती सामान्य असेल, अशी अपेक्षा ठेवता येईल’, असेही साहिन म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेने ब्रिटनमधून येणार्‍या प्रवाशांची कोरोना चाचणी नकारात्मक असायला हवी, असा नियम जारी केला आहे. अमेरिकेत येण्यापूर्वी किमान ७२ तास आधी चाचणी करून ती नकारात्मक असली तरच अमेरिकेसाठी हवाई प्रवासाची परवानगी मिळेल, असे नव्या आदेशात सांगण्यात आले आहे. आतापर्यंत जगातील सुमारे ४०हून अधिक देशांनी हवाईमार्गे ब्रिटनमधून येणार्‍या प्रवाशांवर बंदी जाहीर केली आहे.

leave a reply